Breaking News

लॉकडाऊन 3 मेपर्यंत कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा; देशवासीयांशी साधला संवाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 14) केली. 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रदेशाचे मूल्यांकन केले जाणार आहे. जे प्रदेश करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील तिथले नियम शिथिल केले जातील, असा दिलासाही पंतप्रधान मोदींनी संवाद साधताना देशवासीयांना दिला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनापासून होणारे नुकसान कमी ठेवण्यात भारताला यश आले आहे. शिस्तबद्ध रितीने भारतीयांनी कर्तव्याचे पालन केले आहे. अनेकांना खूप त्रास भोगावा लागला. एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रत्येकजण कर्तव्य निभावत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हीच आदरांजली की प्रत्येकजण कर्तव्य बजावत आहे. या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात विविध उत्सव होतात. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनच्या काळात नववर्षाचे स्वागत देशभऱात झाले, परंतु लोकांनी नियमांचे संयमाने पालन केले. घरात राहून उत्सव लोकांनी साजरे केले ही गोष्ट प्रेरणादायी प्रशंसापूर्ण आहे.
जगात कोरोनाची स्थिती सगळ्यांना माहिती आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाला रोखण्यास कसे प्रयत्न केले याचे आपण साक्षीदार आहात. कोरोनाचे बाधित 100 होण्याच्या आधीच भारताने विदेशी नागरिकांसाठी 14 दिवसांचे विलगीकरण केले. कोरोनाचे फक्त 550 बाधित भारतात होते तेव्हाच 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले. भारताने समस्या वाढण्याची वाट न बघता जेव्हा समस्या दिसली तेव्हाच निर्णय घेऊन ती थांबवण्याचा प्रयत्न केला. हे असे संकट आहे की तुलना योग्य नाही, पण वास्तव हे आहे की जगातल्या बड्या देशांचे आकडे बघितले तर लक्षात येते की भारत खूपच चांगल्या स्थितीत आहे, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
महिन्यापूर्वी जे देश भारताच्या बरोबरीत होते, त्या देशांमध्ये भारतापेक्षा 25-30 टक्के जास्त बाधित झालेत, हजारो लोकं प्राणास मुकलीत. भारताने योग्य वेळी चांगले निर्णय घेतले नसते, तर भारताची स्थिती काय असती याचा विचार करवत नाही, परंतु या अनुभवातून हे स्पष्ट झालंय की आपण जो रस्ता निवडला तोच बरोबर आहे. सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाऊनचा खूप फायदा झालाय. फक्त आर्थिक बाजू बघितले तर खूप महाग पडल्याचे दिसू शकते, खूप किंमत चुकवायला लागली, परंतु जीवितापेक्षा मोठे काही नाही, असे पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले.
कमी स्त्रोत असताना भारताने जो मार्ग निवडला त्याची जगभरात चर्चा होणे स्वभाविक आहे. देशातल्या राज्यांनी व स्थानिक स्वराज्य संस्थांनीही काम केलंय. या सगळ्या प्रयत्नांनंतरही कोरोना ज्या प्रकारे जसा पसरतोय, त्याने सगळ्यांना सतर्क केले आहे. देशातही कोरोनाच्या विरोधात आता लढाई कशी करायची, विजयी कसे व्हायचे, नुकसान कमी कसे होईल, लोकांचे हाल कमी कसे होतील यावर उपाययोजना सुरू आहेत, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.
…तर सशर्त परवानगी मिळणार
पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनाला कोणत्याही परिस्थितीत नवीन ठिकाणी वाढू द्यायचे नाही. स्थानिक स्तरावर एकही रुग्ण वाढला किंवा मृत्यू झाला तर ही चिंतेचा विषय ठरू शकतो. त्यामुळे आपल्याला कोरोना हॉटस्पॉटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतर्कता ठेवायलाच हवी. नवे हॉटस्पॉट आपल्या परिश्रमांना आव्हान देऊ शकतात, नवे संकट निर्माण करू शकतात. त्यामुळे पुढचा एक आठवडा कोरोनाविरुद्धच्या लढाईत कठोरता आणखी वाढवण्यात येईल. 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक भाग, प्रत्येक स्टेशन, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्यांतील आकडेवारीचे बारकाईने मूल्यांकन केले जाईल. जे क्षेत्र या अग्निपरिक्षेत यशस्वी होतील, जिथे हॉटस्पॉटमध्ये वाढ होणार नाही तिथे काही सूट दिली जाऊ शकते, परंतु ही परवनागी सशर्त असेल. बाहेर पडण्याचे नियम अतिशय कडक असतील. लॉकडाऊनचे नियम तोडले गेले आणि कोरोनाचे रुग्ण आढळले तर सगळी शिथिलता परत घेतली जाईल. त्यामुळे आपण स्वत: बेजबाबदारपणा करता कामा नये आणि कुणाला करूही देता कामा नये, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply