Breaking News

कर्मवीर अण्णांची प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार न करता कर्मवीर अण्णांनी समाजासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशभर शिक्षणाची पंढरी निर्माण झाली. अशा महान कर्मवीर अण्णांची प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्याचा वारसा पुढे वाढविण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 9) केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहताना ते बोलत होते.  
कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या निवासस्थानातून संस्थेच्या नवी मुंबई व पनवेल परिसरातील महाविद्यालय-विद्यालय शाखांमध्ये ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधून कर्मवीर अण्णांना आदरांजली वाहिली. या वेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख उपस्थित होते. तत्पूर्वी, सकाळी सोशल डिस्टस्टिंग नियमांचे पालन करून पनवेल शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्यास लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, संस्थेचे माजी सचिव व पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, वाशीमधील मॉडर्न स्कूलच्या प्राचार्य सुमित्रा भोसले, गव्हाण येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या साधना खटावकर, कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, संस्थेचे सहाय्यक निरीक्षक शहाजी फडतरे, जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब कारंडे आदींसोबत संवाद साधला आणि कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होत असताना या संस्थेने भारताच नव्हे; तर आशिया खंडात भरारी घेतली आहे. दरवर्षी सातार्‍यात कर्मवीर अण्णांची पुण्यतिथी हजारो रयत सेवकांच्या साक्षीने साजरी केली जाते. यंदा शतकोत्सव वर्षानिमित्त पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार होती, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरी करता आली नाही, परंतु 4 ऑक्टोबरला संस्थेचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करता येईल.
संस्था क्लस्टर युनिव्हर्सिटी व्हावी हे अण्णांचे स्वप्न होते. त्याला मान्यता मिळाली असल्याचे सांगून कर्मवीर अण्णांच्या आशीर्वादाने तसेच संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्था प्रगतीच्या दृष्टिकोनातून सतत कार्य करीत आहे. अनेक मानांकने आणि उज्ज्वल यश प्राप्त करून संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळविला असल्याचा उल्लेख लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केला. नुकताच राष्ट्रीय स्तरावरील एज्युकेशन वर्ल्ड या मासिकाने एप्रिल 2020च्या विशेषांकामध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील भारतातील अव्वल खाजगी स्वायत्त महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. यात राष्ट्रीय स्तरावर अव्वल 80मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या स्थान मिळवलेल्या महाविद्यालयांत वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, सातारा येथील धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय, कराड येथील सद्गुरु गाडगेबाबा महाराज महाविद्यालय आणि सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने रँकिंग मिळविले. त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेला मातृसंस्था मानून कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयानेही यामध्ये बहुमान मिळविला. एकूणच या दोन्ही संस्थांनी मिळविलेले यश पाहता आनंद होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करून दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे सूत्रसंचालन प्रा. शैलेश वाजेकर यांनी केले.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply