Breaking News

“कर्नाळा बँक बुडवली त्यांचा आदर्श घेऊन रामेश्वर आंग्रे निवडणुकीत”

आमदार प्रशांत ठाकूर यांचा करंजाडे प्रचारसभेत घणाघात

पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यात तुरुंगात असलेले विवेक पाटील यांचा आदर्श रामेश्वर आंग्रे यांनी पूर्णपणे डोळ्यासमोर ठेवला आहे, अशी टीका भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी करंजाडे येथे केली. करंजाडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 15) जाहीर सभा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत झाली. या सभेला प्रचंड प्रतिसाद लाभला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी करंजाडे ग्रामपंचायतीमध्ये विजय आपलाच होणार असा विश्वास व्यक्त केला.
करंजाडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत परिवर्तन पॅनेलची भव्य जाहीर सभा गुरुवारी झाली. या सभेला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवि भोईर, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, विभागीय अध्यक्ष कर्ण शेलार, समिर केणी, राकेश गायकवाड, माजी सरपंच गजानन पाटील, नाथाभाई भारवड, वैशाली जगदाळे, शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे, विक्रम मोरे, दिनेश दिवेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागच्या सरपंचांना संधी मिळाली, पण आज आपण पाहतोय की, ते ज्या पक्षातून उभे आहेत तो पक्ष आता कालबाह्य होत चालला आहे. ते ज्या महाविकास आघाडीतून उभे आहेत ती महाविकास आघाडी चार महिन्यांपूर्वी राज्यातून बाद झाली, तसेच त्यांचे नेते जे कर्नाळा बँकेच्या केलल्या घोटाळ्यात जेलमध्ये जाऊन बसले त्यांचा आदर्श यांनी पूर्णपणे घेत त्यांचा फोटो असलेले पुस्तक घरोघरी वाटून मते मागत आहेत, मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवणार हा निर्धार मतदारांनी केला आहे असे सांगितले.
आमदार महेश बालदी म्हणाले की, शेतकरी कामगार पक्ष आणि विकास हे शब्दच एकमेकांच्या विरुद्ध शब्द असून शेतकरी कामगार पक्षाला करंजाडेमध्ये मत मागायचा अधिकारच नाही.ज्यांच्या पत्रकांवर विवेक शंकर पाटील यांचा फोटो आहे त्यांनी तुमच्या ग्रामपंचायतीचे एक कोटी 75 लाख रुपये बुडवले. या पैशांमुळे करंजाडेमध्ये किती विकास झाला असता याचा प्रत्येक मतदारांनी विचार करावा, असे म्हटले.
करंजाडे ग्रामपंचायत निवडणुकीत मंगेश शेलार हे थेट सरपंचपदाचे उमेदवार असून त्यांनी शिटी ही निशाणी आहे, तर प्रभाग क्रमांक 1 मधून सूरज कर्ण शेलार, देवकु दिलीप वाघे, प्रभाग क्रमांक 2 मधून बिपीन अरविंद गायकवाड, नंदकुमार कृष्णा भोईर, प्रीती मिरेंद्र शहारे, प्रभाग क्रमांक 3मधून सागर यशवंत आंग्रे, अनिता सुनील भोईर, शिल्पा तुषार नागे, तर प्रभाग क्रमांक 4 मधून अतिष अर्जुन साबळे, प्रिया बाळाराम फडके, अर्चना दिनेश धामणकर या निवडणूक लढवत आहेत. दरम्यान गुरुवारी झालेल्या जाहिर सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनेला विजय निश्चित मानला जात आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply