पनवेल तालुक्याने ओलांडला पाचशेचा आकडा; 33 नवे रुग्ण, दोन महिलांचा मृत्यू
पनवेल : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोनाचे सोमवारी (दि. 25) नवे 44 रुग्ण आढळून आले. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 22, पनवेल ग्रामीणमधील 11, तळा तीन, माणगाव, खालापूर व कर्जत प्रत्येकी दोन, तर सुधागड व अलिबाग तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यापैकी पनवेल तालुक्यातील दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमुळेजिल्ह्यातील कोरानाबाधितांचा आकडा 801 आणि मृतांची संख्या 35 झाली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 22 नवीन रुग्ण आढळले असून, दोन महिलांचा मृत्यू झाला आहे, तर दिवसभरात नऊ जणांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका क्षेत्रात खारघरमध्ये 10, नवीन पनवेल पाच, तर कामोठे चार, नावडे फेज-2 व पनवेलमध्ये दोन आणि कळंबोली रोडपालीत प्रत्येकी एक रुग्णाची भर पडली आहे. यात खारघरमधील एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ग्रामीणमध्ये 11 नवीन रुग्णांची नोंद झाली. यात नेरे येथील एकाच कुटुंबातील दोन महिलांचा समावेश आहे. ग्रामीण भागात दिवसभरात 15 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तालुक्यात आतापर्यंत 515 रुग्ण आढळले असून. 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पनवेल मनपा क्षेत्रात तळोजा ओवेपेठ येथील 55 वर्षीय महिला आणि नवीन पनवेल सेक्टर 1मधील 81 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. खारघरमध्ये 10 जणांना कोरोनाची लागण झाली असून, यात सेक्टर 12 येथील रो हाऊस नंबर 3मधील रहिवासी व रे रोडला व्यवसाय असलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. सेक्टर 15 येथे राहणार्या वडाळा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाच्या घरातील तीन जणांना संसर्ग झाला असून, त्याला यापूर्वीच कोरोनाची लागण झालेली आहे. सेक्टर 21मधील एकलव्य सोसायटीतील एकाच कुटुंबातील दोन आणि सेक्टर 13मधील एका डॉक्टरला कोरोनाचा संसर्ग हॉस्पिटलमध्ये कामाच्या ठिकाणी झाला आहे. कळंबोली रोडपाली येथील एका महिलेला कोरोना झाला आहे.
नवीन पनवेल सेक्टर 14 येथील अमृतवेलमध्ये नर्सच्या पतीला आणि सेक्टर 4 मधील मुंबईला सफाई कामगार असलेल्या महिलेला संसर्ग झाला आहे. ए टाईपमधील 67 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 13बी मधील महिला मानखुर्दला वडिलांच्या अंत्यविधीला गेली होती. तिला संसर्ग झाला आहे. आमरीत सोसायटीत एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. कामोठे सेक्टर 8 मधील दीपक सोसायटीतील एकाच कुटुंबातील दोघांना संसर्ग झाला आहे. सेक्टर 34 मधील एक पोलीस आणि एका महिलेला कोरोना झाला आहे. पनवेल साई नगरमधील रेल्वे कर्मचार्याला आणि तक्का येथील मोराज सोसायटीत कोपरखैरणे येथून आपल्या मुलाकडे राहायला आलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात नागरिकांच्या 2357 टेस्ट झाल्या. यात 393 रुग्ण आढळले. त्यापैकी 217 जणांनी कोरोनावर मात केली असून, 40 जणांचे रिपोर्ट मिळालेले नाहीत, तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये 11 नवीन रुग्ण आढळले असून, यात करंजाडेतील चार, नेरे, उलवे नोड, पाली देवद (सुकापूर) प्रत्येकी दोन आणि उसर्ली खुर्दमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. नेरे येथील मारी गोल्ड सोसायटीतील एकाच कुटुंबातील दोन महिलांना कोरोनाचा संसर्ग घरातील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीपासून झाला आहे. ग्रामीण भागात 392 टेस्ट घेण्यात आल्या असून, 40 टेस्टचे रिपोर्ट बाकी आहेत. आतापर्यंत 162 रुग्ण आढळले. त्यापैकी 112 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पाच जणांचा मृत्यू झाला, तर 55 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper