पाली ः प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटात रुग्णांना रक्ताची सातत्याने गरज भासते. या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिहूतील युवकांच्या संकल्पनेतून रविवारी (दि. 25) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात शिहू बेणसे विभागातील नागरिकांसह तरुण व कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनीही रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
डॉ. पुरुषोत्तम भोईर यांच्या नविमुंढाणी (शिहू फाटा) या ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून रक्तदानाचे महत्त्व सांगितले. या वेळी 53 रक्तदात्यांना गौरवपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. रक्तदान हे समाजाचे ऋण फेडण्याचे सर्वोत्तम माध्यम असल्याने अधिकाधिक नागरिक व तरुणांनी रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, असे आवाहन डॉ. दीपक गोसावी यांनी केले. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून मानवी प्राण वाचविण्याचे काम आपण केलेल्या रक्तदानाने होते. त्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन डॉ. अभिषेक शहासने व डॉ. निखिल गरुडे यांनी केले.
अपघातग्रस्त, रुग्ण व जखमींना रक्ताची नितांत गरज भासते. रक्ताला कोणताही जात-धर्म नसतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपून रक्तदान शिबिरासारख्या सामाजिक उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन मानवता जपावी, असे डॉ. पुरुषोत्तम भोईर यांनी सांगितले. या वेळी डॉ. दीपक गोसावी, डॉ. अभिषेक शहासने, डॉ. निखिल गरुडे, डॉ. प्रिया भोईर, डॉ. पुरुषोत्तम भोईर, जीवन घासे, पंकज भोईर, मयूर शेळके, प्रमोद कुथे, अंकुश घासे, प्रमोद खाडे आदी उपस्थित होते.