Breaking News

नागोठणेवरील भीतीचे सावट दूर

नागोठणे ः प्रतिनिधी

नागोठणे येथील दवाखान्यात तपासणीसाठी आलेल्या महिला रुग्णाला काही काळानंतर मुंबईतील रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. शहरातील डॉ. कोकणे यांच्या रुग्णालयात काही वेळ या महिलेने उपचार घेतल्याने शहरासह विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने डॉ. जी. एस. कोकणे यांसह प्रयोगशाळा सहाय्यक व परिचारिकेची स्वॅब तपासणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने नागोठणेकरांवर आलेले भीतीचे सावट दूर झाले आहे.

19 मे रोजी 58 वर्षीय महिलेला काही नातेवाईक येथील डॉ. कोकणे यांच्या कोकणे रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन आले होते. त्या वेळी डॉ. कोकणे यांनी महिलेची चौकशी केली असता आम्ही इथलेच असून पेणमधील चोळे गावात राहतो, असे सांगताना दोन-तीन दिवसांपूर्वी ताप आला होता व आता थकवा आल्याने रुग्णालयात उपचारासाठी आल्याचे डॉ. कोकणे यांना सांगितले. प्रत्यक्षात ही महिला कुटुंबीयांसह काही दिवसांपूर्वी मुंबईहून आल्याची डॉ. कोकणे यांना कुणकुण लागल्याने त्यांनी 15 मिनिटांतच या महिलेची संबंधित गावांतर्गत येणार्‍या पेण तालुक्यातील गडब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करण्याची सूचना केली.

तेथे परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर महिलेला मुंबईच्या रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे या महिलेची स्वॅब तपासणी केली असता कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. सुरुवातीला डॉ. कोकणे यांनी तसेच प्रयोगशाळा सहाय्यक व परिचारिकेने तिची तपासणी केली असल्याने त्याचा गाजावाजा होऊन शहरासह विभागात अफवांना ऊत आला होता. अखेर पेण येथे जाऊन त्यांनी कोविडची तपासणी केली. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तिघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह झालेल्या या महिलेला मुंबईच्या रुग्णालयातून घरी सोडल्याचे समजते, मात्र या महिलेच्या कुटुंबातील चार जणांना कोरोनाची नव्याने लागण झाल्याची माहिती उपलब्ध होत आहे.

चांदोरे गावात आढळला कोरोना रुग्ण

माणगाव ः प्रतिनिधी

माणगाव तालुक्यात दरदिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने तालुक्यातील जनतेची चिंता वाढली आहे. शनिवारी (दि. 29) सायंकाळी उशिरा तालुक्यातील चांदोरे गावातील एका रुग्णाचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तालुक्यात कोरोनाची लागण झालेल्या 39 बाधित रुग्णांपैकी सहा रुग्ण ठणठणीत बरे झाल्याची माहिती माणगाव तालुक्याच्या तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात दरदिवशी माणगाव तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने सार्‍यांचीच डोकेदुखी वाढली आहे. लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यापर्यंत कोरोनापासून मुक्त असलेला माणगाव तालुका चौथ्या टप्प्यात बाधित झाला. तालुक्यातील 16 गावांतून आतापर्यंत 39 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी सहा रुग्ण बरे  झाल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागरिकांनी सरकारच्या सूचनांचे पालन करीत सतर्क राहावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.

किरकोळ वादातून हाणामारी

खोपोली ः प्रतिनिधी

खालापुरातील साबाईनगर आणि खडक आळीतील दोन गटांत किरकोळ वादातून झालेल्या भांडणात एकमेकांना मारहाण करण्यात आली. याबाबत परस्परविरोधी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसानी सर्वांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी 22 जणांविरोधात भा. दं. वि. कलम 452, 143, 147, 148, 149, 323, 324, 504, 506प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार सुभाष म्हात्रे अधिक तपास करीत आहेत.

रमजान ईदनिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कर्जत ः बातमीदार

 कर्जत तालुक्यातील कळंब येथील मुस्लिम तरुणांच्या पुढाकाराने रमजान ईदनिमित्त रहमान फाऊंडेशच्या माध्यमातून कळंब ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यात तांदूळ, आटा, तेल, साखर, चहा पावडर, हळद, मसाला, कडधान्य आदींचा समावेश होता.

कळंब गावासाठी 110 आणि पोशिर चिकनपाडाकरिता 25 किट्स पाठविण्यात आले. या वेळी कळंब ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गणेश बडे, रहमान फाऊंडेशनचे अब्दुल माजिद शेख यांच्यासह कळंबचे तरुण सामाजिक कार्यकर्ते शहजाद लोगडे, मुबिन लोगडे, अदनान डोंगरे, अफझल डोंगरे, फहिम डोंगरे, फरहान खान, झुल्फिकार शाह, साजिद ठाणगे, अब्दुल कादिर मस्ते, आकीब पानसरे, जुनेद डोंगरे, मुनीब खान यांनी विशेष मेहनत घेत गावातील सर्व जातीधर्माच्या गरीब कुटुंबांच्या घरी जाऊन मदत पोहचविण्याचे काम केले.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply