भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांचे प्रतिपादन

मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील एकदरा, म्हालोर, मिठागर, आंबोली, मिथेखार व मुरूड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. ही संख्या वाढता कामा नये यासाठी शासकीय यंत्रणेने सतर्क राहून या विषाणूचा प्रसार रोखला पाहिजे. यासाठी जनजागृती व संचारबंदीचा उपयोग करून घेतला पाहिजे. गावागावांनी सतर्कता राखून मुंबई, पुणे येथून येणार्या लोकांची नोंद व तपासणी करून शासकीय यंत्रणेस सहकार्य करावे. तहसीलदारांनी कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी दक्ष राहावे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी मुरूड तहसीलदार गमन गावित व आरोग्य विभागाशी चर्चा करताना केले.
मुरूड तालुक्याचा आरोग्य प्रश्न ऐरणीवर आला असून यामध्ये सुधारणा होण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी शनिवारी (दि. 30) तहसीलदार गमन गावित यांची कार्यालयात भेट घेतली. या वेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांशीही चर्चा केली. मुरूड तालुक्यात 12 कोरोना रुग्ण आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुरूड तालुका तहसीलदारांची भेट घेतली. त्यांच्या समवेत कोविड सेंटरला भेट दिली. या वेळी आपला जीव धोक्यात घालून काम करणारे तेथील कोविड योध्दे डॉक्टर्स, नर्सेस यांचे जिल्हाध्यक्ष अॅड. मोहिते
यांनी आभार मानले. या वेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथील क्वॉरंटाइन सेंटरला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या परिस्थितीत भाजप आपल्यासोबत असून सर्वतोपरी साहाय्य करण्याची तयारी दर्शवत त्यांचे मनोबल अॅड. मोहिते यांनी वाढवले. या वेळी मुरूड तालुकाध्यक्ष महेंद्र चौलकर, मुरुड शहर अध्यक्ष प्रवीण बैकर, नरेश वारगे, अलिबाग तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे आदी उपस्थित होते.
या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी डॉक्टर व नर्सेससाठीच्या पीपीई किट मास्क, ग्लोजची उपलब्धता पहिली. डॉक्टर, नर्सेसची राहण्याची व्यवस्था तातडीने एमटीडीसीच्या गोल्डन स्वानमध्ये करावी, अशी सूचना अॅड. मोहिते यांनी केली, तर उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर येथे डॉक्टर, नर्सेससाठी वेगळे वॉशरूम आणि बेसिनची व्यवस्था करावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper