कर्जत ः प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात कोरोनाचा ससेमिरा सुरूच आहे. दररोज कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जतच्या व्यापारीवर्गाने 29, 30 जून व 1 जुलै असा तीन
दिवस कडकडीत बंद पाळला, मात्र गुरुवारी (दि. 2) बाजारपेठ उघडल्यानंतर कर्जत बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
तालुक्यात सुरुवातीला कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता, मात्र काही दिवसांनी कोरोनाने तालुक्यात शिरकाव केला आणि हळूहळू त्याने आपला पसारा वाढवला. लॉकडाऊन काढण्यात आल्यानंतर कर्जत शहराबरोबरच तालुक्यात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत. शहरालगतच्या गावांतसुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी कर्जतच्या व्यापारी फेडरेशनने व्यापारीवर्गाची तातडीची सभा बोलावून तीन दिवस बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सलग तीन दिवस कर्जत आणि आजूबाजूच्या गावांतील व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. यापूर्वी बंद पाळताना जीवनावश्यक सेवा म्हणजे किराणा दुकाने, दूध डेअरी, भाजीपाला, औषधांची दुकाने, दवाखाने सुरू असायचे, मात्र या बंदच्या वेळी केवळ वैद्यकीय सुविधा म्हणजे औषधांची दुकाने व दवाखानेच सुरू ठेवण्यात आले होते.
तीन दिवसांच्या बंदनंतर गुरुवारी बाजारपेठ उघडण्यात आल्यानंतर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मुख्य बाजारपेठेत दुचाकी, चारचाकी वाहने कशीही उभी असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. नागरिकांची झालेली गर्दी पाहून उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या सूचनेनुसार कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचार्यांनी बाजारपेठेत पेट्रोलिंग केले. या वेळी गर्दी कमी करण्याच्या सूचना देऊन बेशिस्तपणे वाहने उभी करणार्यांना समज देण्यात आली.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …