Breaking News

जग आणखी बरेच बदलेल

कोरोना विषाणूचा फैलाव जगभरात झाला आणि सगळीकडेच दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. काही ठिकाणी लॉकडाऊन हवा की नको याची प्रारंभी चर्चा झाली, परंतु लॉकडाऊन, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे आदी उपायांना पर्याय नाही हे सार्‍यांच्याच अल्पावधीतच लक्षात आले. कोरोनामुळे आपले जगणे कमालीचे बदलले आहे आणि काही तज्ज्ञ निरीक्षकांच्या मते यातील काही बदल कायमस्वरूपी असतील.

कोरोना विषाणू हा प्रामुख्याने एखाद्या बाधित व्यक्तीच्या नाका-तोंडावाटे बाहेर फेकल्या जाणार्‍या अतिसूक्ष्म थेंबांद्वारे पसरतो, असे शास्त्रज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी म्हटले होते. कालपरवापर्यंत जगभरात हाच दावा सर्वमान्य होता, परंतु नुकतेच 32 देशांतील 239 शास्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला पाठवलेले एक पत्र सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरले असून या पत्रातील दावा जागतिक आरोग्य संघटनेने पूर्णत: मान्य केल्यास सगळ्यांनाच आपल्या कोरोनाविरोधी उपाययोजनांचा आणखी गांभीर्याने फेरविचार करावा लागेल. कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याचे या शास्रज्ञांचे म्हणणे असून तसे पुरावे समोर येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्य केले आहे, परंतु यासंदर्भात अंतिम भाष्य करण्यापूर्वी आणखी सबळ पुरावे एकत्रित करावे लागतील अशी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. आजही जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. जगभरात आतापर्यंत एक कोटी 18 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून सुमारे पाच लाखांहून अधिक लोकांचा या साथीत बळी गेला आहे. यात अमेरिकेत आतापर्यंत सर्वाधिक 30 लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्याखालोखाल ब्राझील 16 लाख, भारत सात लाख, रशिया सहा लाख यांचा क्रमांक लागतो. केसेसमध्ये झपाट्याने होत असलेली वाढ ही व्यापक टेस्टिंगमुळे होत आहे असे म्हणणे योग्य होणार नाही, तर कोरोना महामारी वेगाने फैलावते आहे, असेच म्हणावे लागेल हे आरोग्य संघटनेच्या आपत्तीप्रमुखांचे प्रतिपादन चिंता वाढवणारे आहे. कोरोनामुळे अवघ्या जगाचाच चेहरामोहरा बदलत आहे आणि जेव्हा कधी ही महामारी ओसरेल तेव्हा आपले जगणे बरेचसे कायमस्वरूपी बदललेले असेल, असा सूर आता तज्ज्ञ लावू लागले आहेत. आर्थिक चक्राला चालना देण्याच्या दबावातून अनेक देशांनी प्रारंभीचा लॉकडाऊन शिथिल केला खरा, परंतु त्यानंतर कोरोनाचा फैलाव वाढल्याचे सगळीकडेच दिसून आल्याने अनेक देशांना पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन वा लॉकडाऊनसदृश्य उपाययोजनांकडे वळावे लागले आहे. त्यामुळेच आपल्या जगण्यातील काही गोष्टी या आता कायमस्वरूपी बदलतील हा विचार जोर धरू लागला आहे. चित्रपट, मोठ्या स्तरावरील क्रीडा सामने वा महोत्सव, सांस्कृतिक सोहळे वा साध्या हॉटेल-नाईट क्लबमधील पार्ट्या इथूनपुढे इतिहासजमा होणार की काय अशी भीती व्यक्त होत असून मोठी आर्थिक उलाढाल करणार्‍या या मनोरंजन क्षेत्रातील बाबींसाठी डिजिटल पर्यायांचा शोध वेग घेऊ लागला आहे. चित्रपटांच्या थेट इंटरनेटवरील प्रक्षेपणासोबतच सर्व क्रीडा कार्यक्रमही इथून पुढे निव्वळ घरात बसून स्क्रीनवर बघण्यापुरते उरतील की काय असे वाटत आहे. विमान प्रवास, रस्त्यावरील खाणे वा चहापान इतकेच काय तर डॉक्टरांकडे प्रत्यक्षात जाऊन केली जाणारी आरोग्य तपासणी आदी अनेक बाबींचे स्वरूप येत्या काळात आमूलाग्र बदलण्याची शक्यता आहे.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply