Breaking News

संतप्त शेतकर्याने रस्ताच खोदला

कर्जतमधील अनेक गावांचा संपर्क तुटला

कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यात मागील दोन वर्षे झालेल्या अतिवृष्टीत माले-चिकनपाडा रस्ता वाहून रस्त्यालगतच्या भातशेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे चिकनपाडा येथील शेतकरी रियाज हसन बोंबे यांनी त्यांची नुकसानग्रस्त शेतजमीन लागवडीयोग्य करून द्यावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती, मात्र त्याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने संतप्त शेतकर्‍याने हा रस्ताच खोदला. त्यामुळे येथील वाहतूक बंद होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

मागील वर्षी 21 जुलै 2019 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येऊन माले-चिकनपाडा रस्त्याचा सुमारे 100 मीटर भाग पूर्णतः वाहून गेला होता. पाण्याच्या या प्रवाहाने रस्त्यालगत असलेल्या रियाज बोंबे यांच्या भातशेतीत दगड, मातीचा भराव तसेच रस्त्याची खडी, डांबर जाऊन पिकाची नासधूस झाली. रस्ता वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मोरी बसवून रस्ता रहदारीस खुला केला, मात्र या रस्ताचे काम झाले नसल्याने या वेळीही तो वाहून जाण्याची भीती कायम आहे. दरवर्षी या रस्त्याचे काम केले जाते, मात्र काम दर्जेदार नसल्याने पावसाळी दिवसांत रस्त्याचा काही भाग वाहून जातो. याचा फटका दरवेळेस प्रवाशांबरोबरच शेतकर्‍यांनाही बसत आहे.

कोरोनाच्या काळात बेजार झालेले शेतकरी निदान या हंगामात तरी शेतीतून काही उत्पन्न मिळावे अशा आशेत आहेत. यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पावसाळ्यापूर्वी शेतात गेलेला रस्त्याचा भराव, दगड, माती, डांबर, खडी जेसीबीच्या साह्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने काढून द्यावी तसेच भातशेत लागवडीयोग्य करून द्यावे, अशी विनंती निवेदनाद्वारे अनेक वेळा केली, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने चिकनपाडा येथील शेतकरी रियाज बोंबे यांनी आक्रमक भूमिका घेत हा रस्ताच खोदून बंद केला. त्यामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply