Breaking News

दिवसाला एक हजारपर्यंत चाचण्या

आयुक्त अभिजीत बांगर यांची माहिती

पनवेल : बातमीदार

नवी मुंबईत शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने येत्या काळात शहरातील कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर) आणि अतिदक्षता खाटांची संख्या  वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अतिदक्षता विभागातील 400 अतिरीक्त खाटा, 160 कृत्रिम श्वसन यंत्रणा आणि दिवसाला एक हजारपर्यंत चाचण्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

सध्या शहरातील रुग्णालयांमध्ये मिळून 245 अतिदक्षता खाटा 87 कृत्रिम श्वसन यंत्रणा कार्यान्वित आहेत. यातील 90 टक्के खाटा या भरलेल्या आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना एका रुग्णालयातून अन्य ठिकाणी हलविण्याची गरज निर्माण झाली आहे. खाटांच्या उपलब्धतेसाठी रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांची फरफट होत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. यावर ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी शहरात कृत्रिम श्वसन यंत्रणा उपलब्ध नसल्याचा आरोप केला होता. याचवेळी नागरिकांना रुग्णालयांतील सुविधा तातडीने मिळवून देण्यासाठी पालिका आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी समन्वयांवर भर देण्याची गरजही नाईक यांनी व्यक्त केली होती. शहरात प्रतिजन चाचण्या व स्वॅब चाचण्यांचा वेग वाढला असून त्यामुळे दिवसाला अधिक खाटांची व्यवस्थाही वाढवणे क्रमप्राप्त झाले आहे.

अपेक्षित खर्च 100 कोटी

कोरोनासाठीचा खर्च 100 कोटी पालिकेने अपेक्षित धरला आहे. यात राज्य शासनाकडून दहा कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. मार्च महिन्यापासून आरोग्यसुविधांवर प्रचंड ताण असून कोरोनाच्या काळात खर्चाचा आकडाही मोठा होत असून पालिकेने कोरोनाचा अपेक्षित खर्च 100 कोटी असल्याची माहिती पालिकेच्या वित्त व लेखा विभागाने दिली.

राज्य शासनाकडून कोरोनासाठी मिळणारे अनुदान तसेच पालिका आवश्यक निधी कमी पडू देणार नाही. शहरात अधिक चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी पालिका कटिबद्ध आहे.

-अभिजीत बांगर, पालिका आयुक्त

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply