भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष दिपाली जाधव यांची ग्वाही
माणगाव : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ माणगाव शहरातील जास्तीत जास्त महिलांना मिळवून देणार, अशी ग्वाही भाजप महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित शहर अध्यक्ष दीपाली जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या मान्यतेने व माणगाव तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या शिफारशीने महिला मोर्चा तालुका अध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी नुकतीच पक्षाच्या शहर अध्यक्षपदी दिपाली जाधव यांची नियुक्ती केली. त्यानंतर जाधव यांनी आपल्या निवडीबद्दल प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देऊन पुढील भूमिका स्पष्ट केली.
दिपाली जाधव यांनी सांगितले की, गेली दोन वर्षे मी भाजप महिला मोर्चा माणगाव तालुका सरचिटणीस म्हणून काम केले आहे. भाजपची विचारप्रणाली उत्तुंग आहे. त्यामुळे पक्षाला देशात, राज्यात चांगले यश अलिकडच्या पाच-सात वर्षांमध्ये मिळाले आहे. भाजपने आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचारमुक्त कारभार करून जनतेचा विश्वास जिंकला. गोरगरीब जनतेचा विचार करीत कल्याणकारी योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या काळात आणल्या. त्यामुळे जनतेची ओढ निश्चितच भाजपकडे आहे. मित्रपक्षाने ऐनवेळी भाजपची साथ सोडल्यामुळे भाजप राज्यात सत्तेवर येऊ शकला नाही. तरीदेखील 2019मध्ये इतर सर्व पक्षांपेक्षा अधिक जागा भाजपने राज्यात जिंकल्या. शिवाय केंद्रात पुुन्हा एकदा भाजप सत्तेवर आला. भाजपचे हे यश म्हणजे जनतेने पक्षावर दाखवलेला विश्वास आहे. जनतेच्या प्रश्नासाठी भाजप जीवाचे रान करतो. कठीण परिस्थितीतही हाच पक्ष लवकरात लवकर जनतेसाठी धावून जात आहे. पक्षाची ही भूमिका काम करण्याची पद्धत आगामी काळात शहरातील महिलांना सांगून त्यांच्या मनावर भाजपचे कार्य बिंबवून पक्ष संघटना शहरात अधिकतम मजबूत करण्याचा प्रयत्न करेन. शिवाय शहरात विविध सामाजिक उपक्रम कोरोनाचे संकट दूर झाल्यावर महिलांसाठी राबवून महिला सक्षमीकरणासाठी पक्षनेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाने प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, असेही जाधव यांनी सांगितले.