आरोग्य प्रहर

स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी प्रत्येक जण कसोशीने प्रयत्न करीत असतो. या धावपळीमध्ये अनेक वेळा कामाचा ताण वाढला जातो. परिणामी शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. आजकाल शारीरिक व्याधींसोबतच मानसिक समस्यांचं प्रमाणदेखील वाढल्याचं पाहायला मिळतं. परिणामी नैराश्य, ताण-तणाव या समस्या उद्धवतात. विशेष म्हणजे तणावाचं प्रमाण वाढल्यामुळे अनेक शारीरिक व्याधीदेखील निर्माण होतात, हे फार कमी जणांना माहीत आहे, परंतु हो हे सत्य आहे. तणावाचं प्रमाण वाढल्यानंतर अपचन, बद्धकोष्ठता, छातीत जळजळणे, रात्री झोप न येणे, भूक न लागणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
अनेक वेळा वैयक्तिक किंवा व्यावसायिक ताणामुळे आपण त्रस्त असतो, मात्र या अतिरिक्त ताण घेण्याचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होत असतो. तणावाचं प्रमाण वाढल्यास पोटात आम्ल वाढू शकतं, ज्यामुळे अपचन होतं. त्यातूनच मग मळमळ होणे, अतिसार आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. तसंच या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास ही समस्या गंभीर बनू शकते आणि पोटात रक्त प्रवाह तसेच ऑक्सिजनचे प्रमाण कमी होण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे छातीत जळजळ, सूज येणे, पेप्टिक अल्सर, गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसीज (जीईआरडी) आणि आतडी सिंड्रोम (आयबीएस) होऊ शकतो. म्हणूनच काही सहजसोपे उपाय करुन आपण या समस्यांवर मात करू शकतो.
आपल्या आहारात ताजी फळे, भाज्या, सर्व कडधान्य आणि धान्यांचा समावेश असणे गरजेचे आहे तसंच आहारात फायबरयुक्त आहार घेणं गरजेचं आहे. शीतपेय, मसालेदार पदार्थ, जंक फूड किंवा तेलकट पदार्थांपासून दूर रहा. प्रोबायोटिक्स खाणे उपयुक्त ठरू शकते. कारण हे आपल्या आतड्यांच्या बॅक्टेरियांना दूर करण्यात मदत करते व पचनक्रिया वाढवते. भरपूर पाणी प्या. मद्यपान तसेच धूम्रपान करू नका, या व्यसनांमुळे पाचन तंत्रावर परिणाम होऊ शकतो आणि बद्धकोष्ठता देखील होऊ शकते. जास्त काळ उपाशी राहू नका आणि भूक नसताना खाऊ नका.
व्यायाम करणं हे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही दृष्टीने फायदेशीर आहे. त्यामुळे व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायाम केल्यामुळे आतड्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. तसंच ध्यान आणि योग यांच्या माध्यमातून मनाचं आरोग्य जपलं जाईल.
-डॉ. रॉय पाटणकर
RamPrahar – The Panvel Daily Paper