Breaking News

पेण एसटी डेपोमध्ये पासचा घोटाळा; तीन कर्मचारी निलंबित

पेण : प्रतिनिधी

पेण येथील एसटी बस आगारामध्ये लाखो रुपयांचा पास घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी तीन कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे एसटीच्या पासमधील अफरातफर उघड होण्यास मदत मिळाली आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे 22 मार्चपासून लॉकडाऊन घोषित झाल्याने पासधारक प्रवाशांना प्रवास करता आला नाही. त्यामुळे अशा प्रवाशांना त्यांचे हक्काचे पैसे परत करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. अनेक प्रवाशांनी रकमेच्या परताव्यासाठी एसटी आगाराशी संपर्क साधला. रक्कम परत करीत असताना पासधारकांची नोंद एसटी कार्यालयात न आढळल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. तेव्हा या पासधारकांचे पैसे एसटी कार्यालयात जमा न झाल्याचे उघडकीस आले. पास देणार्‍या कर्मचार्‍यांनी पहिल्या दोन प्रतींवर प्रवाशांची नोंद केली व तिसरी प्रत मात्र कोरी ठेवली. ही तिसरी प्रत दुसर्‍या प्रवाशाला देऊन त्या रकमेची अफरातफर करण्याचा प्रकार घडला आहे. आपला घोटाळा समोर येऊ नये म्हणून पास देणार्‍या कर्मचार्‍यांनी दिलेल्या पासचे बुकही गहाळ केले आहेत.

एसटी पासमध्ये घोटाळा करणार्‍या कर्मचार्‍यांची विभागीय नियंत्रण कार्यालयात यापूर्वीच चौकशी करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. एसटीने स्मार्ट कार्ड योजना लागू केली आहे. या स्मार्ट कार्डद्वारे एसटीचे पास देण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांनीही स्मार्ट कार्डचा आग्रह धरावा. ज्या प्रवाशांना आपला पास अधिकृत आहे की नाही हे तपासून पाहायचे असेल त्यांनी संबंधित आगाराशी संपर्क साधावा.

-अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply