मुंबई : प्रतिनिधी
कर्णधार किएरॉन पोलार्डच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध रोमहर्षक विजयाची नोंद केली. घरच्या मैदानावर खेळणार्या मुंबईने पंजाबचे 198 धावांचे आव्हान तीन गडी राखून पार केले. यासह मुंबईने विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. पोर्लाडच्या खेळीमुळे पंजाबच्या लोकेश राहुलचे शतक झाकोळले.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणार्या मुंबई इंडियन्सच्या इतर फलंदाजांनी चांगलीच निराशा केली, मात्र पोलार्डने एक बाजू लावून धरत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने अवघ्या 31 चेंडूंमध्ये 83 धावांची खेळी केली. यात 10 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. मुंबईच्या सिद्धेश लाड आणि क्विंटन डीकॉक यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली, परंतु त्यांना मोठी खेळी करणे जमले नाही. यानंतर मधल्या फळीत सूर्यकुमार यादवने काहीकाळ पोलार्डची चांगली साथ दिली, मात्र नंतर मुंबईचा डाव परत कोलमडला. मग अल्झारी जोसेफच्या साथीने पोलार्डने मुंबईला विजयाच्या समीप आणून ठेवले. मुंबई आता सामना जिंकणार असे वाटत असताना पोलार्ड अखेरच्या षटकात बाद झाला. सरतेशेवटी जोसेफ आणि चहर यांनी मुंबईला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, किंग्ज इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकल्यावर सलामीवीर ख्रिस गेल आणि लोकेश राहुलने यांनी मुंबईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी झाली. गेलने सर्वप्रथम आपले अर्धशतक साजरे केले. जेसन बेहरनडॉर्फने गेलचा अडरस दूर केला. यानंतर हार्दिक पांड्याने डेव्हिड मिलर आणि करुण नायरला माघारी धाडले, तर जसप्रित बुमराहने सॅम करनचा बळी घेतला, मात्र अखेरच्या दोन षटकांमध्ये लोकेश राहुलने पुन्हा एकदा पंजाबच्या बाजुने सामना फिरवत, संघाची बाजू भक्कम केली. त्याने नाबाद 100 धावा केल्या. मुंबईच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत पंजाबने 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 197 धावांपर्यंत मजल मारली होती.
- पोलार्डकडून पत्नीला विजयाचे गिफ्ट
वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईने पंजाबचा तीन विकेटने पराभव केला. या विजयात किएरॉन पोलार्डने कर्णधाराला साजेशी विस्फोटक खेळी करीत संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलार्डने हा विजय पत्नीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून समर्पित केला. पोलार्ड आणि जीना यांचे 2012मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन अपत्य आहेत. मुलगा सध्या वडिलांसोबत भारतामध्ये आयपीएल सामन्याचा आनंद घेत आहे; तर पत्नीसोबत मुलगी आहे. जीवा तिसर्यांदा गर्भवती राहिली आहे.
83 धावा, 31 चेंडू , 10 षटकार , 3 चौकार