पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांचे रोजगार संपुष्टात आले आणि अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कुटुंबीयांना सण-उत्सवाच्या आनंदात सहभागी होता यावे आणि प्रत्येकाच्या घरात चार घास गोडधोड व्हावे यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गव्हाण-कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना धान्य वाटप करण्यात आले.स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली व हस्ते झालेल्या धान्य वितरण समारंभास गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, ज्येष्ठ नेते जयवंत देशमुख, प्राचार्य साधना डोईफोडे, संस्थेचे आजीव सदस्य प्रमोद कोळी, आजीव सेवक रवींद्र भोईर, उपमुख्याध्यापक सागर रंधवे, ग्रंथपाल महेश म्हात्रे आदी उपस्थित होते. या वेळी पालकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून धान्य वितरित करण्यात आले, ज्यामध्ये प्रत्येकी एक किलो चनाडाळ, साखर, रवा, मैदा व अर्धा किलो गूळ यांचा समावेश आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper