नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाच्या मार्गावर जाणार्या तरुणांना आधीच रोखण्याची गरज आहे. यासाठी महिला पोलिसांची मदत घेतली जाऊ शकते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील तरुण आयपीएस अधिकार्यांशी पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
तरुणांना सुरुवातीच्या टप्प्यावरच दहशतवादाकडे वळण्यापासून रोखले पाहिजे. महिला पोलीस तेथील स्थानिक महिलांसोबत मिळून हे काम करू शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरमधील दहशतवादावर बोलताना म्हटले.
दिल्लीत मी नेहमीच येथून बाहेर पडणार्या तरुण आयपीएस अधिकार्यांशी चर्चा करतो, पण या वेळी कोरोनानमुळे ते शक्य होऊ शकले नाही. असे असले तरी माझ्या कार्यकाळात एखाद्या टप्प्यावर नक्की भेट होईल याची खात्री आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. आपल्या गणवेशामधून मिळणार्या अधिकारांचे प्रदर्शन करता कामा नये. खाकी गणवेशासाठी आदर कधीच गमावू नका, असा सल्लाही त्यांनी या वेळी तरुण अधिकार्यांना दिला.
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, तणावात काम करताना योगसाधना आणि प्राणायाम सर्वोत्तम आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयासाठी काम करता तेव्हा नेहमीच फायदा होतो. मग तुम्ही कितीही काम केले तरी तणाव येत नाही.
Check Also
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन
विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …
RamPrahar – The Panvel Daily Paper