मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅण्डचा जोर हवा, असे म्हणत शिवसेना नेते तथा दै. सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक सदरातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. त्याला राज यांनी उत्तर दिलेले नाही, मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘अभिमन्यू जेव्हा एकटा लढत होता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म कर्णा?,’ असा सवाल केला आहे.देशपांडे म्हणाले की, मी जे मांडतो आहे ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही. पक्षाची अधिकृत भूमिका राज ठाकरे मांडतील. मला वैयक्तिकरीत्या असे वाटते की, 2008पासून जेव्हा महाराष्ट्रातील मराठी मुलांना नोकर्या मिळाव्यात म्हणून मनसेचे प्रयत्न सुरू होते तेव्हा शिवसेनेचे दिल्लीतील खासदार मूग गिळून गप्प होते. ज्या वेळी पाकिस्तानी कलाकारांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकला अशी भूमिका पक्षाने आणि राज ठाकरेंनी घेतली तेव्हा शिवसेनेचे नेते गप्प होते. 2014 आणि 2017च्या निवडणुकीच्या वेळी जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेनेला साद घातली तेव्हा शिवसेनेने आमच्यासोबत दगाफटका केला. रातोरात आमचे नगरसेवक पळविले. महाभारतामध्ये कर्णाच्या रथाचे चाक जेव्हा जमिनीत रुतले होते तेव्हा कृष्णाने कर्णाला जो प्रश्न विचारला तोच मला आज शिवसेनेला विचारावासा वाटतो. जेव्हा अभिमन्यू एकटा लढत होता तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता कर्णा?, अशा शब्दांत मनसेचे संदीप देशपांडे यांनी शिवसेना नेते खासदार राऊत यांना प्रश्न विचारला आहे.
मुंबई असो की महाराष्ट्र, एकच ब्रॅण्ड छत्रपती शिवाजी महाराज!; राणे बंधूंनी राऊतांना फटकारले
मुंबई : महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ठाकरे हा ब्रॅण्ड आहे, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मांडले होते. यावरून राणे बंधूंनी जोरदार निशाणा साधला आहे. ट्विटरवरून त्यांनी राऊतांना आपल्या खास शैलीत फटकारले आहे. आमदार नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबई असो की महाराष्ट्र… एकच ब्रॅण्ड… छत्रपती शिवाजी महाराज! एका वाक्यात त्यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले आहे, तर माजी खासदार निलेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पवार आणि ठाकरे महाराष्ट्राचे ब्रॅण्ड आहेत. जगात ब्रॅण्डची निर्मिती वस्तू विकायला केली जाते म्हणजे महाराष्ट्र विकला असं म्हणायचंय काय? महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठे केले. हे राज्य कोणाच्या बापाचे नाही. हे राज्य जनतेने मोठे केले, कुठल्या विकाऊ ब्रॅण्डने नाही.