पनवेल : वार्ताहर – पनवेल जवळील पेबगड येथे ट्रेकींगसाठी गेलेले तीन जण जंगलामध्ये रस्ता चुकले होते. या संदर्भात त्यांनी पनवेल तालुका पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर तत्काळ पोलिसांचे पथकाने जंगल पिंजून काढून चुकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले. या वेळी त्या तिघांनी सुटकेचा निःश्वास सोडून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते.
नेरे चौकी येथे कर्तव्यावर असताना रुपेश पाटील राहणार नेरे यांना फोन आला की तीन व्यक्ती या पेबगड येथे ट्रेकिंग करता गेले असता तेथे जंगलामध्ये त्यांना कोणताही खाली उतरण्याचा रस्ता दिसून येत नाही तरी त्यांना मदत करा असा फोन आल्याने त्यांनी तत्काळ नेरे पोलीस चौकी येथे येऊन माहिती दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पगार, पोलीस हवालदार अवतार, पोलीस शिपाई तुषार पाटील, असे तत्काळ रुपेश पाटील यांच्यासोबत जाऊन तेथील संतोष या आदिवासी मुलाची मदत घेऊन भरपावसात त्या तीन व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना सुखरूप परत खाली आणले.
ओमकार शिरीष शेट्टी (24, रा. मुंबई), जयेश संजय मेहता (23, रा. मुंबई), पुनीत रामदास बेहलानी (23, रा. मुंबई) अशी तिघांची नावे आहेत. या वेळी त्यांनी पनवेल तालुका पोलिसांचे आभार मानले.