अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याच्या हद्दीत खोल समुद्रामध्ये बंदी काळात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या 87 बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. या बोटींचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरू झाली असून, रायगडच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांनी बोटींच्या मालकांना नोटीस बजावल्या आहेत.
जून ते जुलै या कालावधीत मासळी व इतर सागरी प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात प्रजनन होत असते. याशिवाय समुद्र खवळलेला असतो व वादळी हवामान असते. प्रजनन काळात समुद्रातील मासळीचे जतन व्हावे तसेच खवळलेल्या समुद्रात बोटी बुडून जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठी 1 जून ते 31 जुलैदरम्यान यांत्रिकी नौकांना समुद्रामध्ये मासेमारी करण्यास शासनाकडून बंदी घालण्यात येते. या बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास बोटींवर कारवाई केली जाते.
यंदा रायगड जिल्ह्यामध्ये जून महिन्यात 39 आणि जुलै महिन्यात 48 अशा एकूण 87 बोटी बंदी काळात मासेमारी करताना मत्सव्यवसाय विभागातर्फे पकडण्यात आल्या. त्यांचे परवाने रद्द करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या बोटींवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय बंदी कालावधीत यांत्रिकी नौका समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेल्यावर अपघात झाला असता, नौकामालकांना शासनाकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नाही. नौका पुनर्वसनासंबंधीचा प्रस्तावदेखील विचारात घेतला जाणार नाही. बंदी कालावधीत अपघातात मच्छीमारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना कोणत्याही प्रकारची मदत शासनाकडून मंजूर केली जाणार नाही, असे रायगडचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त एस. आर. भारती यांनी सांगितले.
Check Also
झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!
‘पुरवैय्या’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …
RamPrahar – The Panvel Daily Paper