Breaking News

नागोठण्यात प्रकल्पग्रस्तांचे हात जोडो आंदोलन

नागोठणे : प्रतिनिधी
येथील रिलायन्सच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी तसेच 6 सप्टेंबरच्या शांतता मोर्चात 34 जणांवर केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने शेकडो प्रकल्पग्रस्तांनी नागोठणे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून हात जोडो आंदोलन केले. गुन्हे मागे घ्या; अन्यथा आम्हाला अटक करा असा, पवित्रा या वेळी प्रकल्पग्रस्तांनी घेत आंदोलन केले.
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या अखत्यारीतील स्थानिक लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने राज्य संघटक राजेंद्र गायकवाड तसेच स्थानिक पदाधिकारी शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे, प्रमोदिनी कुथे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता एसटी बसस्थानक ते पोलीस ठाणे अशी प्रकल्पग्रस्तांची रॅली काढून पोलीस ठाण्यासमोर हात जोडो आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात प्रमुख पदाधिकार्‍यांसह चेतन जाधव, सुरेश कोकाटे, बळीराम बडे, अनंत फसाळे, प्रशांत शहासने, तेजस  मिणमिणे, जगदीश वाघमारे, सुजित शेलार, प्रमोद कुथे, एकनाथ पाटील, मोहन पाटील, गुलाब शेलार, नीता बडे, उषा बडे, निलेश शेलार, जनार्दन घासे, गौतमी शेलार, रूपा भोईर आदींसह शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.
रिलायन्स कंपनीने आंदोलन दडपण्यासाठी आमच्यावर खोटे आरोप करून प्रकल्पग्रस्तांवर गुन्हा दाखल केला आहे, मात्र त्यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचे राजेंद्र गायकवाड यांनी या वेळी स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या काळातील कामगारांचा पगार दोन दिवसांत दिला जाईल असा रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकार्‍याने शब्द दिला होता, मात्र दोन महिने उलटूनही रिलायन्स शब्दाला जागली नसल्याचेही गायकवाड म्हणाले.
शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्यात दिवसभरात दोन वेळा पोली सठाण्यात चर्चा होऊनही कोणताही निर्णय घेण्यात यश आले नाही. त्यामुळे सायंकाळपर्यंत आंदोलनकर्त्यांचे शांततेच्या मार्गाने आंदोलन चालूच राहिले होते. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Check Also

निराधारांच्या योजनांचे अनेक प्रस्ताव मंजुरीअभावी प्रलंबित

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील निराधार …

Leave a Reply