दापोली : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. आमदार योगेश कदम विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला आहे. खासदाराविरोधात आमदाराने हक्कभंगाचा प्रस्ताव देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकार आहे. विशेष म्हणजे यावरून महाविकास आघाडी सरकार एकत्र असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तटकरे हे दापोली विधानसभा मतदारसंघात होणार्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमांना आपल्याला निमंत्रण देत नाहीत तसेच आपल्याला विश्वासात न घेता कार्यक्रम करीत असल्याचे कारण देत आमदार कदम यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे. मंडणगड तालुक्यातील पुलासाठी तटकरेंसोबत आपणही प्रयत्न केले, मात्र कार्यारंभ आदेश येण्याआधीच यांनी भूमिपूजन उरकले. स्थानिक आमदार असूनही आपल्याला या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही किंवा भूमिपूजनाच्या फलकावर नावही टाकले नाही, असा आरोप आमदार कदम यांनी केला आहे. तटकरे यांचे हे राजकारण गंभीर असून, आपल्या हक्कांवर गदा आणणारे आहे, असे सांगत कदम यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव पाठवला आहे.
आमदार योगेश कदम यांचे हे आहेत आरोप
योगेश कदम यांनी आरोप केला आहे की, माझ्या दापोली मतदारसंघात काही दिवसांपूर्वी भूमिपूजनाचे कार्यक्रम झाले. त्या वेळी खासदार तटकरे उपस्थित होते, मात्र त्या कार्यक्रमांचे निमंत्रण मला नव्हते. हा श्रेयवादाचा विषय नाही, पण माझ्या मतदारसंघात मला डावलून भूमिपूजन करणे हे आमदार म्हणून माझ्या हक्कांवर गदा आणणारे आहे. हे सहन करण्याच्या पलिकडे गेले आहे. भूमिपूजन करताना त्या फलकावर माझ्या नावाचा उल्लेख करीत नाही. मला कुठल्याही कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. मला वाटते जाणूनबुजून डावलण्याचे काम त्यांच्याकडून झाले. त्यामुळे मी ही भूमिका घेतली. जे घडले ते अपेक्षित नव्हते. सुनील तटकरे यांच्या आढावा बैठकांनाही निमंत्रण दिले जात नाही. याआधीही खेड नगरपरिषदेच्या हद्दीतही चिपळूणच्या आमदारांनी येऊन उद्घाटन केले, पण मला निमंत्रण नव्हते. जाणूनबुजून होत असेल तर मला माझी भूमिका स्पष्ट करावी लागेल.