पनवेल : रामप्रहर वृत्त
महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी तसेच त्यांना संरक्षण मिळवून देण्यासाठी सक्षम टीम तयार करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमाताई खापरे यांनी गुरुवारी (दि. 5) येथे दिली. उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक तसेच नियुक्तिपत्र प्रदान कार्यक्रम उमाताई खापरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाला. त्याचबरोबर खापरे यांनी पत्रकार परिषदेतून संवाद साधला. त्या वेळी त्या बोलत होत्या. त्यांनी राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभारावर ताशेरे ओढले. या कार्यक्रमास महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व कोकण विभाग प्रभारी नीलम गोंधळी, प्रदेश सरचिटणीस अश्विनी जिचकर, उपाध्यक्ष रिधा रशीद, महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल पंचायत समितीच्या सभापती देवकीबाई कातकरी, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, तालुका मंडल अध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, माजी उपमहापौर व नगरसेविका चारुशीला घरत, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती ‘क’च्या सभापती हेमलता म्हात्रे, प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती सुशीला घरत यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आपल्या भाषणात उमाताई खापरे यांनी राज्य सरकारच्या बेजबाबदार कारभाराचा समाचार घेतला. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोविड सेंटरमध्ये झालेल्या घटना, बालिकांवर झालेल्या अत्याचाराने राज्य दहशतीखाली आले आहे, मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्री त्याकडे कानाडोळा करीत आहेत. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक वेळा या संदर्भात पत्रव्यवहार, आंदोलने केली, पण हे राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. महिला आयोग, बाल आयोगाला हे सरकार अद्याप अध्यक्ष देऊ शकले नाही तसेच दिशा कायदा अमलात आणला नाही. झोपलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेला जागा होत नाही. तशीच परिस्थिती राज्य सरकारची झाली आहे, असा सणसणीत टोला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला. महिला मोर्चा ही महिलांची ताकद आहे. भाजपमध्ये महिलांना सातत्याने सन्मानाची वागणूक आणि आदराचे स्थान दिले जाते. त्यामुळे महिला मोर्चा पक्षाच्या आणि समाजाच्या कार्यात सक्षमपणे काम करीत आहे. कोरोना काळात फक्त आणि फक्त भाजप कार्यकर्ते लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आणि यामध्ये महिला मोर्चाचा सहभाग होता याचा अभिमान आहे, असे सांगून खापरे म्हणाल्या की, संघटनात्मक कोकण दौर्याला आजपासून प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगाने महिला मोर्चाची फळी अधिकाधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असून वकील, डॉक्टर, पत्रकार, नर्स, आशा सेविका, खेळाडू अशा विविध क्षेत्रांतील महिलांची सक्षम टीम निर्माण करणार आहे. ही टीम महिलांवरील अत्याचारांना रोखण्यासाठी काम करेल. कोरोना काळात नागरिकांना भरभरून मदत करणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल या बैठकीत जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने उमाताई खापरे यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला टाळ्यांच्या गजरात सर्वांनी अनुमोदन दिले. कोकण विभाग प्रभारी नीलम गोंधळी यांनी भाजप प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या उद्देशाने काम करीत असून, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव असल्याचे अधोरेखित केले. भाजप देशाचा विचार करणारा पक्ष आहे, तर बाकी पक्ष एका घराण्यापुरते मर्यादित राहिल्याची टीकाही त्यांनी केली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने सक्षम व डॅशिंग नेतृत्व या विभागाला लाभले असल्याचे सांगून त्यांच्यामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. प्रदेश उपाध्यक्ष रिधा रशीद, महापौर डॉ. कविता चौतमोल यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. प्रत्येक महिला कार्यकर्त्याने नवीन महिलेला पक्षाशी जोडत संघटना अधिकाधिक मजबूत करावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी, तर चारुशीला घरत व मृणाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी अश्विनी पाटील, सरचिटणीसपदी मृणाल खेडकर, उपाध्यक्षपदी संध्या शारबिंद्रे, संगीता पाटील, कोषाध्यक्षपदी रसिका शेट्ये, चिटणीसपदी कुंदा मेंगडे, जयश्री धापटे, सदस्य म्हणून आशा म्हस्कर, अनिता शहा, सोशल मीडिया जिल्हा संयोजकपदी गायत्री परांजपे यांची नियुक्ती जाहीर करून नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.
भाजपमध्ये महिलांना आदराचे स्थान आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण देणारा भाजप एकमेव पक्ष आहे. आमदार प्रशांत ठाकूर म्हणजे मूर्ती लहान, पण कीर्ती महान असे दमदार नेतृत्व आहे. महिलांना सपोर्ट करणारे ते चांगले आमदार लोकप्रतिनिधी आहेत. -अश्विनी जिचकर, सरचिटणीस, भाजप महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश
RamPrahar – The Panvel Daily Paper