सोलापूर, उंब्रज ः प्रतिनिधी
सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग व आशियाई महामार्गावर उंब्रज ता. कराड येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत आठ जणांचा मृत्यू, तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या अपघातांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळजवळ एका रुग्णवाहिकेला शनिवारी (दि. 14) पहाटे पावणेचारच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात रुग्णवाहिकेमधील तीन जण जागीच ठार, तर 10 जण जखमी झाले आहेत. पुण्यावरून हैदराबादकडे जाताना रुग्णवाहिकेने एका माल वाहतूक ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. एका मृतदेहाला घेऊन ही रुग्णवाहिका निघाली होती.
मृतांत 35 वर्षांच्या शववाहिका चालकाचाही समावेश असून त्याचे नाव समजू शकले नाही. रवी राठोड (38) व बुद्धीबाई चन्नापागूल (45) अशी अन्य दोघा मृतांची नावे आहेत.
तसेच आशियाई महामार्गावर उंब्रज ता. कराड येथील तारळी नदीच्या पुलावरून मिनीबस सुमारे 50 फूट खाली कोसळून भीषण अपघात घडला. या अपघातात पाच जण जागीच ठार, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मिनीबस वाशीवरून गोव्याकडे निघाली होती. अपघातात तीन पुरुष, एक महिला आणि तीन वर्षांचा मुलगा असे पाच जण ठार झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उंब्रज तालुका कराड येथील तारळी नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्यभागी असणार्या रिकाम्या चौकोनातून ही मिनीबस सुमारे 50 फूट खाली कोसळल्याचे समजते.
Check Also
लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…
काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …
RamPrahar – The Panvel Daily Paper