उर्मिलांच्या पक्षप्रवेश वक्तव्यावर भाजपची टीका
मुंबई : प्रतिनिधी
कोणाला पक्षात प्रवेश द्यायचा हा सर्वस्वी त्या पक्षाचा प्रश्न आहे, मात्र उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशाने शिवसेनेची महिला आघाडी मजबूत होईल असे म्हणणे म्हणजे बाळासाहेबांनी ज्या महिला कार्यकर्त्यांना रणरागिणी अशी उपमा दिली, त्या लढवय्या कार्यकर्त्यांचे अवमूल्यन करण्यासारखे आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
राज्यपाल नामनिर्देशित जागेवर शिवसेनेने बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्या पार्श्वभूमीवर उर्मिला यांनी मंगळवारी (दि. 1) शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. उर्मिला यांच्या प्रवेशाने शिवसेनेची महिला आघाडी मजबूत होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्यांनी दिली आहे. त्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते दरेकर यांनी हल्लाबोल केला.
शिवसेनेच्या वाढीसाठी आजवर अनेक महिला कार्यकर्त्यांनी घरादाराची पर्वा न करता काम केले आहे. रस्त्यावरील आंदोलनात या कार्यकर्त्या नेहमी आघाडीवर असायच्या. आदरणीय बाळासाहेबांनी या कार्यकर्त्यांना रणरागिणी अशी उपमा दिली होती. मीना कांबळी, उमेशा पवार, सुधाताई चुरी अशा अनेक कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. शिवसेनाप्रमुखांनी नेहमीच त्यांचा सन्मान केला. त्यामुळे उर्मिला यांच्या येण्यामुळे शिवसेनेची महिला आघाडी मजबूत होईल असे म्हणणे म्हणजे त्या जुन्या कार्यकर्त्यांच्या कामावर पाणी फेरण्याचा हा प्रकार आहे, असे दरेकर म्हणाले.
शिवसेनेच बदलते स्वरूप आता ठळकपणे दिसू लागले आहे. प्रियांका चतुर्वेदी यांना खासदार केले गेले. काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढलेल्या व्यक्तीला पक्षात प्रवेश दिला जातोय. पक्षाची मूळ विचारधारा सोडून केवळ सत्तेच्या समीकरणाभोवती शिवसेनेचे राजकारण फिरताना दिसत आहे, असा आरोपही दरेकर यांनी या वेळी केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper