पनवेल तालुका पोलिसांचा इशारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फार्म हाऊसवर कडक निर्बंध
पनवेल : वार्ताहर – थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील अनेक फार्म हाऊसवर पाटर्या आयोजित केल्या जातात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अशा प्रकारच्या पार्ट्यांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन व गैरकृत्य करणार्यांवर पनवेल तालुका पोलिसांचा वॉच असणार आहे. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सांगितले.
दौंडकर पुढे म्हणाले की, 31 डिसेंबरला मुंबईपासून जवळ असलेल्या पनवेल परिसरात फार्म हाऊस, रिसॉर्ट, खासगी घरे आदी ठिकाणी विविध प्रकारच्या पाटर्या आयोजित करण्यात येतात व त्याची जाहिरात सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जाते. अशा फार्म हाऊसची माहिती घेण्यास सुरुवात झाली असून, अशा प्रकारचे नियोजन आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. पाटर्यांसाठी फार्म हाऊस त्यासाठी भाड्याने दिले जातात. अशा ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य केले जातात. माणसांची जमवाजमव होते. नाचगाणी, मद्य, ड्रग्ज आदी अमली पदार्थ पुरविले जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर कोणी नियम तोडले व याची माहिती मिळाली तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
याबाबत संबंधित फार्म हाऊस मालकांनी येत्या 15 तारखेपर्यंत याबाबतची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात द्यायची आहे. अशा प्रकारे फार्म हाऊसची सर्व प्रकारची माहिती घेणे सुरू असून त्यांना नोटिसा बजाविण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सर्व नियम व अटींचे पालन करून नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन या वेळी दौंडकर यांनी केले आहे.