डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांनी केला अत्याचार
डोंबिवली ः प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ बनवून या व्हिडीओच्या आधारे या मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी मागील नऊ महिन्यांपासून विविध ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल करत पोलिसांनी आतापर्यंत दोन अल्पवयीन आरोपीसह 23 जणांना अटक केली आहे. उर्वरित सहा आरोपींचा शोध सुरू असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास ठाणे सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले करत आहेत.
डोंबिवलीनजीक असलेल्या भोपर परिसरात राहणार्या 14 वर्षीय मुलीची एका तरुणाशी ओळख होती या ओळखीतून त्यांच्यात जानेवारी 2021मध्ये शारीरिक संबध निर्माण झाले, मात्र या तरुणाने या दरम्यान तरुणीचे अश्लील व्हिडीओ तयार करत या व्हिडीओच्या आधारे या तरुणीला ब्लॅकमेल करत आपल्या इतर मित्रांसमवेत या तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा या पीडित तरुणीचा आरोप आहे. मागील नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल 29 जणांनी पीडितेला व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत डोंबिवली, रबाळे, वडवली, बदलापूर या विविध ठिकाणी तिला नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
दोन दिवसांपूर्वी यातील सात आरोपींनी पीडितेला वडवली येथे नेत तिच्यावर एकाच वेळी सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला प्रचंड वेदना होऊ लागल्याने तिने ही घटना आपल्या आईला सांगितली. त्यानंतर आईने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ठाणे सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे, पोलीस उपायुक्त संजय गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौगुले आणि पथक याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
दरम्यान, पीडितेला उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची तब्येत स्थिर असल्याचे कराळे यांनी सांगितले.
अतिशय संतापजनक घटना : देवेंद्र फडणवीस
डोंबिवलीच्या भोपरमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 29 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ऐकून मन सुन्न झालं. ही अतिशय भयंकर आणि संतापजनक घटना आहे. महिला अत्याचाराची सातत्याने वाढणारी ही प्रकरणं चीड आणणारी आहेत. डोंबिवलीसारख्या भागात अशी घटना अतिशय गंभीर आहे. यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. आरोपींना जरब बसेल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी राज्य सरकारने आतातरी तातडीने आणि गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
अत्याचार रोखण्यासाठी अॅट्रॉसिटीसारखा कायदा करा : चित्रा वाघ
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (एससी, एसटी अॅट्रॉसिटी) धर्तीवर कायदा बनवा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. या मागणीचे निवेदन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. चित्रा वाघ यांनी सांगितले की, महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून महिलांवर अत्याचार करणार्या गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराची चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची सूचना करणार्या राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची अन्य राज्यातील घटनांशी तुलना करून मुख्यमंत्र्यांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत आपण आणि आपले सरकार किती असंवेदनशील आहे, हेच दाखवून दिले आहे.