Breaking News

लसीकरणासाठी केंद्राकडून नियमावली जाहीर

राज्यांना महत्त्वाच्या सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशात बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण शनिवारपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. याआधी केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणासंबंधी नियमावली पाठवली आहे. या नियमावलीत लसीकरणादरम्यान कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

कोरोना योद्धयांना सर्वात आधी लशीचा लाभ मिळणार असून, त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे संवादही साधणार आहेत. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचार्‍यांना 2934 केंद्रांवर लस टोचण्यात येणार आहे. एका केंद्रावर दररोज एका सत्रात 100 जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति 100 कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात येणार आहेत.

लसीकरणासाठी वयोमर्यादा आखण्यात आलेली असून 18 पेक्षा जास्त वय असलेल्यांनाच यामध्ये सहभागी करुन घेण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय गरोदर माता किंवा ज्यांना गरोदरपणाबद्दल नक्की माहिती नाही तसंच स्तनपान करणार्‍या मातांचे लसीकरण करु नये, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारने या वेळी लसची अदलाबदल केली जाऊ नये, असे स्पष्ट सांगितले आहे. पहिला डोस ज्या लशीचा देण्यात आला होता त्याच लशीचा डोस दुसर्‍या वेळी दिला जावा, असे केंद्राने नमूद केले आहे. औषध नियामकाने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींच्या वापराला परवानगी दिली असून 28 दिवसांच्या अंतराने दोन डोस घ्यावे लागणार आहेत.

ज्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्यासाठी प्रोटोकॉल पाळावा लागणार आहे. कोरोनाची लक्षणे असणार्‍यांचे, प्लाझ्मा थेरपी झालेल्यांचे तसेच इतर कारणांमुळे रुग्णालयात दाखल असणार्‍यांचे लसीकरण चार ते आठ आठवड्यांसाठी स्थगित करावे लागणार आहे.

देशात शनिवारपासून सुरू होणारी ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रपतींच्या कार्यालयाशी सल्लामसलत करून पोलिओ लसीकरणाच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून, पोलिओ लसीकरण 31 जानेवारीला असेल, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

रायगडात आज चार ठिकाणी लसीकरण

अलिबाग : प्रतिनिधी

बहुप्रतिक्षित कोरोनाच्या लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. रायगड जिल्ह्यात चार ठिकाणी लसीकरणला प्रारंभ होणार आहे. पहिल्या दिवशी 400 आरोग्य कर्मचार्‍यांना कोव्हिशिल्ड लस दिली जाणार आहे. यासाठीची सर्व प्रशासकीय तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी दिली, ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठाण्याहून विशेष वाहनाने करोनाच्या नऊ हजार 700 लसी जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात आठ हजार 300 आरोग्य कर्मचार्‍यांना ही लस दिली जाणार आहे. अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय, पेण उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथील एमजीएम रुग्णालय आणि पोळ मेडीकल कॉलेज येथे लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यासाठी चारही केंद्रांवर लशींच्या कुप्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सकाळी नऊ वाजल्या पासून या केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात होईल. पहिल्या दिवशी प्रत्येक केंद्रांवर 100 जणांना याप्रमाणे एकूण 400 आरोग्य कर्मचार्‍यांना ही लस टोचली जाणार आहे. तर नोंदणी केलेल्या सर्व आरोग्य कर्मचार्‍यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी केले.

या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे उपस्थित होते. अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी 9 वाजता लसीकरणाला सुरुवात होईल. या वेळी पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply