Breaking News

टीम इंडियाची फिनिक्स भरारी

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत 2-1ने हरवून नवा इतिहास रचला आहे. या मालिकेत भारताने यंदा विजयाची हॅट्ट्रिक केली. गेल्या सलग दोन वर्षी या प्रतिष्ठेच्या मालिकेत आपण ‘कांगारूं’ना नमविले आहे, पण या वेळी पहिल्या कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने मिळविलेला विजय वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदीर्घ काळ स्मरणात राहणारा आहे.
हल्लीचे युग धावते आहे असे म्हटले जाते. या झटपट जमान्यात स्पर्धेचा निकालही लवकरात लवकर लागावा अशी क्रीडाप्रेमींची इच्छा असते. लोकप्रिय खेळ क्रिकेटमध्येही टी-20ची धूम आहे, पण खरं क्रिकेट अनुभवायचे असेल तर कसोटीशिवाय पर्याय नाही. पाच दिवसांच्या या सामन्यात अनेक चढउतार पाहावयास मिळतात. इथे प्रत्येक खेळाडूचा कस लागतो. त्यांच्या धैर्य, संयम, चिकाटी यांची जणू ही ‘कसोटी’ असते. याचा प्रत्यय भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत पुरेपूर आला. उभय संघांतील एकदिवसीय मालिकेत यजमानांनी, तर टी-20 मालिकेत पाहुण्यांनी बाजी मारल्याने कसोटी मालिकेत काय होणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते.
बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत होते. कारण या वेळी स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर संघात होते. शिवाय गोलंदाजीचा ताफा त्यांच्याकडे सज्ज होता. दुसरीकडे भारताचा कर्णधार व प्रमुख फलंदाज विराट कोहली पहिला सामना खेळून पितृत्वासाठी रजा टाकून मायदेशी परतणार होता. आधीच दुखापतीमुळे अनुभवी इशांत शर्मा तसेच भुवनेश्वर कुमार हे दोन गोलंदाज ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाऊ शकले नव्हते, तर सलामीवीर रोहित शर्मा दोन सामन्यांनंतर उपलब्ध होणार होता. त्यामुळे भारतीय संघ बलाढ्य ‘कांगारूं’चा मुकाबला कसा करणार, असा सवाल व्यक्त केला जात होता. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधील दिग्गज खेळाडूंनी तर भारत ही मालिका 4-0ने पराभूत होईल, असे भाकित वर्तविले होते. अ‍ॅडलेड येथील पहिल्या कसोटीतील भारताचा दुसरा डाव अवघ्या 36 धावांमध्ये गुंडाळला गेला आणि संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता भारतीय संघ यातून सावरू शकणार नाही असेच सार्‍यांना वाटले होते.
कर्णधार विराट मायदेशी परतल्यानंतर नेतृत्वाची धुरा अजिंक्य रहाणेकडे आली. पहिल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाजीची प्रमुख मदार असलेल्यांपैकी एक मोहम्मद शमी संघाबाहेर गेला. त्यामुळे संघाची चिंता वाढली होती, पण संधीचे सोने करणे कशाला म्हणतात हे रहाणेने पुन्हा एकदा दाखवून दिले. मेलर्बनला झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शतकी खेळी साकारून भारताला विजय मिळवून दिला. रहाणेला कसोटीत पर्दापण करणार्‍या शुबमन गिलने चांगली साथ दिली. अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपली उपयुक्तता सिद्ध केली. गेल्या काही वर्षांपासून त्याचा खेळ कमालीचा उंचावला आहे. मेलबर्नमध्ये गोलंदाजही लयीत दिसले. यामध्ये प्रमुख गोलंदाजांबरोबरच पर्दापणवीर मोहम्मद सिराजने छाप सोडली.
दुसरी कसोटी भारताने जिंकली असली तरी तिसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ जोरदार पुनरागमन करेल, असा कयास बांधला जात होता. अपेक्षेप्रमाणे यजमानांनी जोरदार सुरुवात केली. या वेळी ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथला सूर गवसला आणि त्याने शतक ठोकले. मार्नस लाबुशेन व अन्य काही फलंदाजांनीही आपले काम चोख बजावले. प्रत्युत्तरादाखल भारतीय फलंदाजीही बहरली. रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा यांनी योगदान दिले. फॉर्मशी झगडत असलेल्या ऋषभ पंतने मोक्याच्या वेळी अर्धशतकी खेळी केली. त्याचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. त्यानंतर हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन यांनी चिवट फलंदाजी करीत तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखला. या दोघांनी मिळून तब्बल 259 चेंडू खेळून काढत सिडनीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना अक्षरश: रडविले.
एकीकडे भारतीय संघ अनपेक्षित कामगिरी करीत होता. दुसरीकडे मात्र एकापाठोपाठ एक खेळाडू जायबंदी होत होते. ब्रिस्बेनच्या चौथ्या व निणार्यक कसोटीआधी मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन हे खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या सामन्यासह मालिका जिंकण्याची नामी संधी होती. पहिल्या डावात यजमानांनी 369 धावा केल्या. भारताची सुरुवात मात्र अडखळत झाली. प्रमुख फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नसताना कसोटी पर्दापण करणार्‍या शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतकी खेळी करून मोठी आघाडी घेण्याचे ऑस्ट्रेलियाचे मनसुबे उधळून लावले. या दोघांनी सातव्या गड्यासाठी 123 धावांची मजबूत भागीदारी करून संघाचा डाव सावरला. त्यानंतर भारताने यजमानांना दुसर्‍या डावात जास्त हात मोकळे करू दिले नाहीत. त्यांना 294 धावांमध्ये रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. एका डावात पाच बळी टिपण्याची कामगिरी सिराजने केली, तर पहिल्या डावात तीन गडी बाद करणार्‍या शार्दुलने दुसर्‍या डावात चार गड्यांना तंबूचा रस्ता दाखविला. आता बारी होती भारतीय फलंदाजांची. सलामीवीर रोहित शर्मा लवकर बाद झाला, परंतु शुभमन गिलने 91 धावांची खेळी करून रोहितची कमी जाणवू दिली नाही. त्याने पुजारासोबत किल्ला लढविला. पुजारानेही अर्धशतक केले. 211 चेंडूंत 56 धावा केल्याने त्याच्यावर काहीशी टीकाही झाली, पण त्या वेळी एखादी विकेटही भारताला भारी पडू शकली असती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुजाराने पडझड होऊ न देता एक बाजू लावून धरली. कर्णधार अजिंक्य रहाणे मोठी खेळी करू शकला नाही, पण त्याने आपल्याला विजयासाठी खेळायचे आहे हा संदेश सहकार्‍यांना दिला. शिवाय मयांक अग्रवालच्या जागी ऋषभ पंतला फलंदाजीत बढती देऊन योग्य चाल खेळली. पंतनेही विश्वास सार्थ ठरविला. विशेष म्हणजे मागच्या वेळी केलेली चूक न करता पंत शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. गेल्या वेळी नेटाने खेळणार्‍या वॉशिंग्टन सुंदरने चुकीचा फटका मारून आपली विकेट बहाल केली. मयांक आणि शार्दुल ठाकूरही झटपट बाद झाले, मात्र त्यामुळे विशेष काही फरक पडला नाही. पंतने विजयी चौकार लगावून सहकारी आणि चाहत्यांना जल्लोषाची वाट मोकळी करून दिली. त्याने नाबाद 89 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून सामनावीराचा किताब पटकाविला.
अशी होती नव्या भारतीय क्रिकेट संघाची कहाणी. इथे ना होते स्टार खेळाडू, ना विक्रमवीर. होती ती जिद्द, परिश्रम आणि विजयाची आस. तसे पाहता चौथी कसोटी अनिर्णीत राखली असती तरी मालिकेत भारत विजयी ठरला असता, पण युवा खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवून देत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. सांघिक खेळाच्या बळावर टीम इंडियाने मिळविलेला हा ऐतिहासिक विजय म्हणजे फिनिक्स भरारीच आहे.
‘अजिंक्य’ भारत!
या संस्मरणीय विजयासाठी शांत, संयमी पण तितकाच हुशार कर्णधार अजिंक्य रहाणेचे आवर्जून कौतुक केले पाहिजे. त्याने स्वत: शतकी खेळी करून सहकार्‍यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली. त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर मैदानावर योग्य वेळी योग्य पावले उलचून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केले. कर्णधाराला सहकार्‍यांनीही तोलामोलाची साथ दिली. वरिष्ठ-नवोदित अशा सर्वांनी आपले योगदान दिले आणि गाबाच्या मैदानावर ‘न भुतो’ असा विजय साकारला. त्यासाठी विशेष अभिनंदन! हॅट्स ऑफ टीम इंडिया!!

  • समाधान पाटील मो. क्र. 9004175065

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply