Breaking News

पनवेल पालिकेत बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवणार्यांवर कारवाईची मागणी

पनवेल : प्रतिनिधी

महापालिकेत बनावट प्रमाणपत्र देऊन काही स्वच्छता कर्मचार्‍यांनी सॅनिटरी निरीक्षक म्हणून नेमणूक मिळवून प्रशासनाची फसवणूक केली असल्याचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी बुधवारच्या महापालिकेच्या सभेत सांगितले. या प्रकरणाची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्याने भ्रष्ट कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बुधवारी (दि. 20) ऑनलाइन झाली. या सभेत पालिकेतील कर्मचार्‍यांच्या भ्रष्टाचाराचे किस्से नगरसेवक नीलेश बावीसकार यांनी मूळ पावती क्रमांक, तारीख, त्यावरील नावे, रक्कम आणि कार्बन कॉपीवरील नावे आणि रक्कम यामध्ये कसा फरक आहे हे दाखवून दिले. या वेळी अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी महापालिकेत सॅनिटरी निरीक्षक म्हणून नेमणूक मिळण्यासाठी शासनमान्य नसलेल्या संस्थेची प्रमाणपत्र देऊन काहींनी फसवणूक केली असल्याची माहिती देऊन खळबळ उडवून दिली.

महापालिकेत काम करणार्‍या सफाई कामगाराला शैक्षणिक पात्रता असल्यास सॅनिटरी निरीक्षक म्हणून प्रमोशन देताना शासनमान्य असलेल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हरमेन्ट या संस्थेचा कोर्स करून त्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. पनवेल महापालिकेत सात सॅनिटरी निरीक्षक आहेत. त्यातील दोन कर्मचार्‍यांनी एका खाजगी संस्थेचा कोर्स करून त्या प्रमाणपत्रावर सॅनिटरी निरीक्षक म्हणून नोकरी मिळवली आहे. या संस्था कोठे आहे. याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याची माहिती मनोज भुजबळ यांनी सभागृहाला दिली. याबाबत चौकशी करण्यात येईल, असे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सभागृहाला सांगितले.

शासनमान्य नसलेल्या संस्थेच्या प्रमाणपत्राद्वारे दोन कर्मचार्‍यांनी सॅनिटरी निरीक्षक म्हणून नोकरी मिळवली आहे. त्याबाबत मी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. मला  प्रशासनाने चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या प्रकारची चौकशी करून फसवणूक करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.

-अ‍ॅड. मनोज भुजबळ, नगरसेवक

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply