Breaking News

शेकापसह दोन्ही काँग्रेसला ओहोटी; भाजपत महाभरती ; ‘कृउबा’चे संचालक प्रकाश पाटील भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल, उरण विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये मोठी भरती सुरू आहे. भाजपकडे सातत्याने इतर पक्षांतील लोकांचा ओढा वाढत असताना रविवारी (दि. 29) झालेल्या महाभरतीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व शेकाप नेते संदीप पाटील, पनवेल अर्बन बँकेचे माजी चेअरमन अजय कांडपिळे, राष्ट्रवादीचे सुनील घरत, भगवान गायकर, अशोक शेळके आणि जयवंत महामुनी यांनीही समर्थकांसह भाजपत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विजय खानावकर यांचे बंधू व राष्ट्रवादीचे नेते दिलीप खानावकर, शेकापच्या नगरसेविका राणी कोठारी, काँग्रेस नेते भीमसेन माळी, सुरेश फडके, संतोष ठाकूर हेही समर्थकांसह भाजपत दाखल झाले आहेत. पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात असलेल्या पाटणोली, मोसारे, नानोशी, मानघर, वाघिवली, बैलवाडी, गराडा, आवळीचा मळा येथील काँग्रेस, शिवसेना, शेकापच्या कार्यकर्त्यांनी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच प्रकाश परशुराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नानोशी ग्रामपंचायतीच्या सरपंच वंदना रमेश पाटील, पंढरीनाथ पाटील, चंगीबाई भल्ला, रमेश पाटील, महादेव पारधी, मधुकर शेळके, सुनील भगत, चंद्रकांत पाटील, प्रमोद पाटील, नामदेव पाटेकर यांच्यासह आजी-माजी सरपंच, सदस्य आणि शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला. 

या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, आमदार नसतानाही कोट्यवधींची विकासकामे करणारे डॅशिंग नेते महेश बालदी फक्त व्यक्ती नसून संस्था आहेत. त्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघाच्या शाश्वत व सर्वांगीण विकासासाठी महेश बालदी यांच्याशिवाय पर्याय नाही.

 जेएनपीटीचे विश्वस्त व जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कर्नाळा बँकेत 90 टक्के शेकाप कार्यकर्त्यांचे पैसे आहेत. त्यामुळे त्यांना माहीत आहे की कार्यकर्ते काहीही करणार नाहीत. ते निश्चिंत असतील, पण या बँकेत ग्रामपंचायतींची करोडो रुपयांची रक्कम जमा आहे. ग्रामपंचायतींना विकासकामांना निधी या बँकेकडून मिळत नाही. असे असतानाही उरणचे आमदार एकही शब्द का काढत नाहीत, का शांत बसले आहेत, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. मोहोपाडा रसायनी परिसरात 10 वर्षांपूर्वीच देवळोली, जांभिवली ही दोन धरणे तयार आहेत, मात्र उरणच्या आमदारांकडे राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे रसायनी भागातील नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. पनवेल, तळोजापर्यंत मेट्रो आली, पण ही मेट्रो उरण, चौक, रसायनी भागात पोहचली पाहिजे. मोहोपाड्याची नगरपालिका झाली पाहिजे असे आमदारांना का वाटत नाही, असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित करतानाच आपण जनतेच्या विकासाची सर्व कामे करू, अशी ग्वाही दिली.

प्रकाश पाटील यांनी प्रवेश करताना आपल्या मनोगतातून महेश बालदी यांना ताकदीचे बळ देऊ, असे आश्वसन दिले. प्रास्ताविक भाजपचे तालुका उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे यांनी केले. या सोहळ्यास भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उपाध्यक्ष संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष म्हात्रे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्या रेखा म्हात्रे, नगरसेवक मनोहर म्हात्रे, नगरसेविका हेमलता म्हात्रे, सीता पाटील, विभागीय अध्यक्ष सुभाष पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मी पनवेलमध्ये उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी निधी आणला. रुग्णालयाला महाराष्ट्रभूषण पद्मश्री डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्याची मागणी मी आणि महेश बालदी यांनी केली. आता हे रुग्णालय आदरणीय तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने ओळखले जाणार आहे.

-प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल

कर्नाळा बँकेच्या नावाने शेकापच्या पुढार्‍यांनी राजकारण केले, मात्र कर्नाळा किल्ल्याच्या विकासासाठी आम्ही निधी मंजूर करून घेतला. साडेबारा टक्के भूखंडावर राजकारण करण्यात आले, पण आम्ही तो प्रश्न सोडवून प्रकल्पग्रस्तांना दिलासा दिला. येत्या काही दिवसांत  प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड मिळणार आहेत.

-महेश बालदी, भाजप नेते

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply