मेलबर्न : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजर्या करीत असलेल्या भारतीय संघाला 5 फेब्रुवारीपासून इंग्लंडबरोबर कसोटी मालिकेत दोन हात करावे लागणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉजच्या मते या कसोटी मालिकेवर भारतीय संघ निर्वादित वर्चस्व मिळवेल. आपल्या युट्यूब चॅनलवरल एका व्हिडीओत ब्रॅड हॉज म्हणाला की, माझ्या मते भारतीय संघ ही कसोटी मालिका 3-0 किंवा 3-1च्या फरकाने जिंकेल. अहमदाबाद येथे होणार्या तिसर्या कसोटी सामन्यात (डे-नाईट कसोटी सामना) इंग्लंडचा संघ वरचढ ठरू शकतो, पण भारतीय संघ पुनरागमन करू शकतो. अखेरच्या सामन्यातही भारतीय संघाचाच विजय होईल. चेन्नई येथे होणार्या दोन्ही कसोटी सामन्यांत भारतीय संघ एकहाती विजय मिळवू शकतो. भारतीय संघ इंग्लंडचा पराभव करून लॉर्ड्सवर होणार्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत खेळताना दिसेल. भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चार सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. 5 फेब्रुवारीपासून चेन्नई येथे पहिला कसोटी सामना खेळला जाईल. त्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी चेन्नईतच दुसरा सामना होणार आहे. त्यानंतर अहमदाबाद येथे अखेरचे दोन कसोटी सामने होणार आहेत.
…तर इंग्लंडचा संघ भारताचा पराभव करू शकतो -स्वान
लंडन : वृत्तसंस्था इंग्लंडचा संघाचा भारत दौरा सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा महान फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वान याने भारतातील विजयाचे सूत्र सांगितले आहे. स्वानने इंग्लंडच्या संघाला सल्ला देताना भारताचा पराभव कसा करायचा हेही सांगितले. ‘इंग्लंड संघाने मागील चुकांमधून धडे घ्यायला हवेत. 2012च्या भारत दौर्यावर पीटरसनने फिरकीचा अप्रतिम उपयोग करून यश मिळवले होते. त्याचा योग्य अभ्यास केल्यास इंग्लंडला भारत दौरा यशस्वी करता येऊ शकेल. पीटरसनने फिरकीविरुद्ध खेळण्याचा इंग्लंडचा दृष्टिकोन बदलला. तो अतिआक्रमक कर्णधार होता तसेच तंत्रशुद्ध फलंदाजी हे त्याचे वैशिष्ट्य होते,’ असे स्वान याने म्हटले आहे.