Breaking News

राज्यातील मंत्र्यांचं चाललंय काय?

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर या सरकारमधील मंत्री आता रंग दाखवू लागलेत असे दिसत आहे. दोन सख्ख्या बहिणींच्या (एक कथित पत्नी) आरोपांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले असतानाच, आता शिवसेना मंत्र्याचे नाव तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात समोर आले आहे.

महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांची सर्कस आहे, असे म्हटले जाते. विरोधी पक्ष भाजपनेही तशी संभावना अनेकदा केलेली आहे. खरोखरच ही सर्कस आहे, मात्र असमतोल आणि असंबंध असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. कोणत्याही सरकारमध्ये मंत्री म्हणून निवड झालेल्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या खात्याच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून द्यायचा असतो. त्यांच्या अडी-अडचणी सोडवून त्यांचे जीवन कसे सुकर होईल या दृष्टीने कारभार चालविणे अपेक्षित असते, पण महाराष्ट्रात चित्र नेमके उलटे दिसत आहे. मंत्री जनतेला न्याय द्यायचे सोडून अन्यायच करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दोन सख्ख्या बहिणींनी गंभीर आरोप केले. त्यातील एक मुंडे यांची कथित पत्नी असून, ते खुद्द मुंडेंनेही मान्य केले आहे. या महिलेपासून मुंडे यांना दोन मुलेही आहेत, तर दुसरी तिची बहिण आहे. आधी या कथित पत्नीच्या बहिणीने मुंडेंवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते, मात्र नंतर तिने घूमजावही केले. हे वादळ क्षमते ना क्षमते तोच स्वत: मुंडेंच्या कथित पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले. आपली मुले असुरक्षित असून, त्यांचे काही बरे-वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी मुंडे जबाबदार असतील, असे तिने पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले होते. मुंडेंवरील आरोपांचा धुरळा खाली बसला असताना आता ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत आले आहेत. पुण्यात आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे नेते असलेले वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. या तरुणीसोबतच्या मंत्री राठोड याच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून, या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, अशी भाजपची मागणी आहे. काही भाजप नेत्यांनी संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचीही मागणी लावून धरली आहे. राज्य सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर आता एकेक मंत्री आपले रंग दाखवू लागले आहेत. कुणावर बलात्काराचे, तर कुणावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे आरोप होत आहेत. साधू-संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाराष्ट्रासाठी या गोष्टी लांच्छनास्पद आहे. ही सत्ताधारी मंडळी साधूंनाही सोडायला तयार नाहीत. याच सरकारमधील एक मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर साधूंवर अजिबात विश्वास ठेवू नका, साधूंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राला या राज्यकर्त्यांनी कुठे नेऊन ठेवलंय, असा सवाल राज्यातील जनता करीत आहे. आता मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे, मात्र त्यांनी तशी धमक अजूनपर्यंत तरी दाखविलेली नाही. बघू, करू हेच ते बोलत आहेत. म्हणूनच ‘उद्धवा अजब तुझे सरकार’, असे म्हणण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply