Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मेरीटाइम इंडिया समिटचे उद्घाटन

उरण : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 ते 4 मार्चदरम्यान होणार्‍या ‘मेरीटाइम इंडिया समिट 2021’ या तीन दिवसीय शिखर संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या पुढाकारातून या शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात भारतीय सागरी क्षेत्रातील व्यवसायाच्या संभाव्य संधींचा आणि आत्मनिर्भर भारतासाठी सागरी क्षेत्राच्या योगदानाचा आढावा घेतला जाणार आहे.

हे शिखर संमेलन आभासी पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. यात भारतीय बंदरे आणि सागरी क्षेत्रामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी 2 मार्च ते 4 मार्च या कालावधीत तीन दिवसीय शिखर संमेलन आणि विविध प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मेरीटाइम इंडिया व्हिजन 2030’चे प्रकाशन करण्यात येईल. त्याचबरोबर सागरमाला, सागरतट समृद्धी योजना, अर्थ गंगा कार्यक्रम, राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल आदी प्रकल्पांचा शुभारंभही या वेळी करण्यात येईल. कार्यक्रमात पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुंतवणूकक्षम प्रकल्पांच्या संयोजनाचे प्रकाशन तसेच भारतात व्यापारी जहाजांना प्रोत्साहन देण्यासाठी एका योजनेचा शुभारंभही करण्यात येणार आहे.

जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी प्लेनरी सत्र 1मध्ये ‘जागतिक दर्जाच्या बंदरांचा विकास’ या विषयावर आपले विचार व्यक्त करतील. मला अतिशय आनंद होत आहे की या शिखर संमेलनात मी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे प्रतिनिधित्व करणार आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह मोठ्या बंदरांचा विकास, सुगम व्यापारासाठी स्मार्ट बंदरे विकसित करण्याचे महत्त्व व बंदरे आणि टर्मिनल्सच्या डिजिटलायझेशनचा प्रभाव याविषयी मी माझे विचार मांडणार आहे. मला विश्वास आहे की या संमेलनाच्या आयोजनाच्या माध्यमातून भारतातील सागरी उद्योगासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य, भागीदार देशांदरम्यान या क्षेत्रातील ज्ञान व संधींचे परस्पर विनिमय करण्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ उपलब्ध होईल, असे जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी म्हटले आहे.

सध्या भारतासह सर्व जग कोविडचा सामना करीत आहे. ही बाब विचारात घेऊन आभासी पद्धतीने संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्रालय व फिक्की (एफआयसीसीआय) औद्योगिक भागीदार व ईवाय ज्ञान भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. संमेलनात 24 भागीदार देश सहभागी होतील आणि 400हून अधिक प्रकल्पांचे प्रदर्शन या ठिकाणी करण्यात येणार आहे. या संमेलनात सागरी उद्योग क्षेत्रातील विविध भागधारक अर्थात धोरणकर्ता, वरिष्ठ सरकारी अधिकारी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार, सागरी क्षेत्रातील तज्ज्ञ, जहाज वाहतूक कंपन्यांचे मालक, जगभरातील मोठमोठ्या बंदरांचे प्रतिनिधी तसेच भारतातील सागरी किनारा लाभलेल्या राज्यांमधील सरकारचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला एक धोरणात्मक व्यापार केंद्र म्हणून स्थापित करीत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देशातील बंदरांची भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका असेल. या संमेलनात ‘बी 2 बी’ आणि ‘जी 2 बी’ बैठकांद्वारे भागधारकांमध्ये संवाद वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. बंदरांचे आधुनिकीकरण व नवीन बंदरांचा विकास; जहाज निर्मिती, जहाज दुरुस्ती व जहाज पुनर्प्रक्रिया क्षेत्र; अंतर्देशीय जलमार्ग भारतातील वाहतुकीचा एक अद्वितीय मार्ग; सागरी किनारपट्टीवरील वाहतूक, मुख्य भूमीशी कनेक्टिव्हिटी आणि मल्टी-मॉडल लॉजिस्टिक, आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक आणि बल्क कार्गो परिवहन; बंदर आधारित औद्योगिकीकरण बंदर शहरे आणि मेरीटाइम क्लस्टरची निर्मिती बंदरांमध्ये नूतनीकरणयोग्य ऊर्जा; सागरी कौशल्य विकास, सागरी वित्त व विमासारख्या क्षेत्रातील गुंतवणुकीच्या आकर्षक संधी प्रदर्शित करण्यासाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात येईल.

‘मेरीटाइम इंडिया समिट 2021’ हे भारतातील सागरी किनार्‍यावरील प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी निर्माण करण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ असेल. या संमेलनामुळे बंदरे व वाहतूक क्षेत्राची भरभराट होण्यास मदत होईल. म्हणूनच स्मार्ट, प्रभावी आणि वाहतुकीचे जाळे निर्माण करण्यासाठी योग्य नियोजन, एकत्रीकरण आणि विकास यामुळे देशाचा विकास होण्यास मदत होईल, तसेच मेक इन इंडिया धोरण यशस्वी होण्यात याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल, अशीही माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी या वेळी दिली.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply