Breaking News

पाली बायपास भूसंपादन प्रक्रियेत एकाही शेतकर्यावर अन्याय होऊ देणार नाही

आमदार रवींद्र पाटील यांची ग्वाही

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील पाली-बलाप-झाप या नियोजित बाह्यवळण (बायपास) रस्त्यासाठी प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया सुरु केली असून, त्याला स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. या बायपास भूसंपादन प्रक्रियेत एकाही शेतकर्‍यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका आमदार आमदार रविशेठ  पाटील यांनी शुक्रवारी (दि. 26) पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली आहे.

अष्टविनायकापैकी एक स्थळ असलेल्या व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार्‍या पालीतील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी फार मोठ्या संख्येने भाविक पालीत येतात तसेच या परिसरात विविध निसर्गरम्य  पर्यटन स्थळे, लेण्या, ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले, गरम पाण्याचे कुंड, धबधबे आहेत. तेथे येणार्‍या पर्यटकांची संख्यादेखील मोठी आहे. पालीतील लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र येथील जुने व अरुंद रस्त्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालीसह परिसराच्या विकासासाठी पाली – बलाप बायपास होणे काळाची गरज आहे. मात्र बाह्यवळण मार्ग होत असताना स्थानिक शेतकर्‍यांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. शेतकरी व स्थानिक ग्रामस्थांची भूमिका समजून घेण्यासाठी लवकरच पाली तहसील कार्यालयात बैठक घेण्यात येईल. त्या वेळी शेतकर्‍यांना योग्य तो न्याय देण्याची भूमिका घेतली जाईल, एकाही शेतकर्‍यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी दिली.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply