Breaking News

योग्य प्रसिद्धी आणि नियोजनाअभावी फणसाड अभयारण्याकडे पर्यटकांची पाठ

मुरूड ः प्रतिनिधी

रायगडातील कोकण किनारपट्टीवर हिरव्यागार झाडांच्या कुशीत वसलेले एक घनदाट जंगल अर्थात फणसाड अभयारण्य होय. मुंबईपासून 160 किमी अंतरावर पनवेल, पेण व अलिबाग मार्गावरील विस्तीर्ण असे फणसाड अभयारण्य म्हणजे निसर्गाचे एक वरदानच आहे, मात्र फणसाड अभयारण्याची योग्य ती प्रसिद्धी न केल्याने महसुलात प्रचंड घट झाली. तसेच सुविधांचा अभाव असल्याने येथील पर्यटकांची गर्दी घटली आहे.  विस्तीर्ण अशा अभयारण्यात साग व निलगिरीची भलीमोठी झाडे असल्याने कडक उन्हातही दाट सावली मिळते. ऐन, किंजल, जांभूळ, हेड, कुडा, गेळ, अंजली, कांचन, सावर, सीताअशोक, सर्पगंधा, रानतुळस, कुर्डू, कडीपत्ता, उक्षी अशा औषधी वनस्पतीही येथे आढळतात, मात्र एवढी धनसंपदा असतानाही फणसाड अभयारण्याची योग्य प्रसिद्धी न केल्याने या ठिकाणी पर्यटकांची संख्या कमालीची रोडावली आहे. मुरूड तालुक्यात दरवर्षी पर्यटनस्थळ असणार्‍या समुद्रकिनारी पाच लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेटी देतात, परंतु आलेल्या पर्यटकांना फणसाड अभयारण्याकडे वळवण्यात फणसाड अभयारण्य प्रशासन अपयशी ठरले आहे. मोजकेच पर्यटक या ठिकाणी येत असल्याने फणसाड अभयारण्याला मिळणार्‍या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. फणसाड अभयारण्य प्रशासनाने योग्य प्रसिद्धी न केल्याने येथे येणार्‍या पर्यटकांना सदरचे अभयारण्य कोठे आहे हेच माहीत होत नाही. अलिबागमार्गे येताना साळाव पुलाच्या मुख्य भागात फणसाड अभयारण्याचा बॅनर अथवा प्रसिद्धिपत्रक लावणे आवश्यक आहे, परंतु हेसुद्धा कित्येक वर्षे न केल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक अभयारण्याकडे वळू शकले नाहीत. मुंबई, पनवेल, पुणे आदी ठिकाणी प्रसिद्धी करणे आवश्यक असतानाही याकडे दुर्लक्ष झाल्याने पर्यटक येथे येत नाहीत. यापुढील काळात तरी फणसाड अभयारण्याने प्रसिद्धीचा मार्ग अवलंबावा, अशी मागणी वन्यजीवप्रेमींतर्फे करण्यात येत आहे. फणसाड अभयारण्यातील वन्यजीवांचे फोटो लावून पर्यटकांना आकर्षित करणे आवश्यक असताना नेमक्या या कामाकडेच प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. फणसाड अभयारण्याची स्वतंत्र वेबसाइट नाही. त्यामुळे परदेशातून येणार्‍या पर्यटकांना अथवा स्थानिक लोकांना येथे कसे यावे हेच कळत नाही. परिणामी पर्यटकांची संख्या रोडावत आहे. फणसाड अभयारण्यात विकासकामांवर खर्च केला जात आहे, परंतु ज्या घटकापासून आर्थिक उत्पन्न वाढणार आहे त्याकडेच अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. पर्यटकांना जलद व गतिमान सुविधा प्राप्त करून देणे गरजेचे आहे. फणसाड प्रशासनाने याबाबत तातडीने सुधारणा करून पर्यटकांच्या संख्येत वृद्धी आणावी, जेणेकरून फणसाडचा महसूल वाढण्यास मदत होईल. वन्यजीव पाहण्यासाठी गाडी उपलब्ध झाली तर फणसाडचे महत्त्व वाढून महसूलही वाढेल. वरिष्ठ कार्यालयाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. फणसाड अभयारण्याच्या स्थापनेला अनेक वर्षे होऊन गेली तरी प्रसिद्धीसाठी कोणताही निधी खर्च करण्यात आला नाही. परिणामी पर्यटकांची गर्दी खेचण्यात हे अभयारण्य अपयशी ठरले आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply