Breaking News

‘ते’ माकड अखेर पिंजराबंद; सगळी माकडे पकडण्याची भाजपची मागणी

पोलादपूर ः प्रतिनिधी

पोलादपूर शहर व तालुक्यात धुमाकूळ घालून अनेकांना चावे घेत दहशत निर्माण करणार्‍या माकडाला अखेर बुधवारी (दि. 25) पकडण्यात वनविभागाला यश आले. आदिवासी बांधवांच्या मदतीने लावलेल्या जाळ्यात हे पिसाळलेले माकड जेरबंद झाले. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या महिला शहर संघटक माई तथा उज्ज्वला जयंत शेठ-मराठे यांनी त्रास देणारी सगळी माकडे पकडण्याची मागणी केली आहे. पोलादपूर शहरानजीकच्या काटेतळी गावामध्ये एका माकडाने रविवारी पाच-सहा जणांना कडकडून चावे घेतल्यानंतर मंगळवारी पोलादपूर शहरात या माकडाने प्रवेश करून बाजारपेठेमध्ये व्यापारी, पादचारी आणि महिलांना त्रास देण्यास सुरूवात केली होती. या वेळी दुकानदार  आणि पेपरविक्रेता अशा दोघांचे माकडाने चावे घेतल्याने त्यांनी तातडीने डॉक्टरांकडून रेबिजचे इंजेक्शन घेतले. त्याच वेळी काटेतळीतील रिक्षामालक आणि एका बालकासही माकडाने चावा घेतल्याने त्यांनाही इंजेक्शन घ्यावी लागले आहे. वनविभागाने तातडीने आदिवासी तरुणांच्या मदतीने माकडाला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले होते, मात्र दिवसभर या माकडाने दहशत कायम ठेवून वनकर्मचार्‍यांना झुंजविले. दरम्यान, अनेक महिलांचे पापड, फेण्या तसेच धान्य व कडधान्य माकडांनी फस्त केल्यामुळे पावसाळ्याची बेगमी गमवावी लागली असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे भाजप महिला मोर्चाच्या शहर संघटक माई तथा उज्ज्वला जयंत शेठ-मराठे यांनी मोठ्या प्रमाणात महिलावर्गाची स्वाक्षरी मोहीम राबवून त्रास देणारी सर्व माकडे पकडावी याबाबत निवेदन महाड येथील उपवनसंरक्षक शिंदे यांना तसेच पोलादपूरचे गुजर यांना देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply