खोपोली ः प्रतिनिधी
गौण खनिज दंडाची सुमारे 33 लाख 24 हजार 592 रुपये थकबाकीमुळे खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी खोपोली नगर परिषदेचे बँक खाते सील करण्याचे आदेश काढले आहे. श्रीमंत पालिकेवर नामुष्की ओढावल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. खोपोली नगर परिषदेच्या भानवज येथील स.नं.58 /2 येथील क्षेत्र 0-03- 5 आर व स.न.58/3 पैकी क्षेत्र 0-53-07 आर या जागेमध्ये अनाधिकृतपणे उत्खनन केल्यामुळे पालिकेला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 48 (7) अन्वये अनाधिकृत गौण खनिज उत्खनन दंड 33 लाख 24 हजार 592 रुपये ठोठावण्यात आला होता. खालापूर तहसील महसूल विभागाकडून वारंवार सूचना देऊनही खोपोली पालिकेने थकीत दंडाची रक्कम शासन जमा न केल्याने सक्तीची वसुलीचा निर्णय तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी घेतला. खोपोली पालिका मुख्याधिकारी यांच्या अधिकार क्षेत्रात येत असलेल्या बँक खात्यातील व्यवहार तत्काळ थांबविण्यात यावे असे आदेश तहसीलदार चप्पलवार यांनी काढले आहेत. त्यामुळे पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला.
कार्यकारी दंडाधिकारी यांना प्राप्त अधिकाराचा वापर करीत खोपोली नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांचे बँक खाते सील करण्याचे आदेश काढले आहेत. शासनाच्या थकीत महसूल वसुलीच्या दृष्टीने ही कारवाई केली.
-इरेश चप्पलवार, तहसीलदार, खालापूर