Breaking News

टीम इंडियाने उधळला विजयाचा रंग

तिसर्‍या वन डेत इंग्लंडचा धुव्वा; मालिकाही घातली खिशात

पुणे ः प्रतिनिधी
 भारतीय संघाने रविवारी इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात दमदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिका 2-1 अशी जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघापुढे 330 धावांचे आव्हान ठेवले होते, पण ठरावीक फरकाने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यामुळे भारताला या सामन्यात सहज विजय मिळवता आला.
भारताच्या 330 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात झोकात झाली खरी, पण त्यानंतर त्यांना धक्के बसत गेले. भारताने पहिल्याच षटकात जेसन रॉयला बाद केले होते. त्याचबरोबर जॉनी बेअरस्टोलाही तिसर्‍या षटकात भुवनेश्वरनेच बाद केले आणि इंग्लंडची 2 बाद 28 अशी अवस्था केली होती. त्या वेळी भारतीय संघाकडे तिसरा बळी मिळवण्याची संधी चालून आली होती. त्या वेळी गोलंदाजीही यापूर्वी दोन विकेट्स मिळवणारा भुवनेश्वर कुमारच करीत होता, पण हार्दिकमुळे भारताला ही संधी पटकावता आली नाही. त्यानंतर टी. नटराजनने स्टोक्सला 35 धावांवर बाद केले.
स्टोक्स बाद झाल्यावर डेव्हिड मलानने या वेळी 50 धावांची दमदार खेळी साकारली खरी, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताचा युवा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्यानंतर मलानसह कर्णधार जोस बटलर आणि लायम लिव्हिंगस्टोन यांना बाद केले आणि इंग्लंडचे कंबरडे मोडले. शार्दुलने तीन विकेट्स मिळवल्यावर इंग्लंडचा संघ या वेळी बॅकफूटवर ढकलला गेला. त्यानंतर मोइन अली आणि सॅम करन यांनी काही काळ फलंदाजी केली, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
भारताने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. भारताला या वेळी शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर 103 धावांची सलामी मिळाली होती, पण त्यानंतर भारताने 54 धावांमध्ये चार विकेट्स गमावल्या आणि त्यांची 4 बाद 157 अशी अवस्था झाली होती. त्या वेळी पंतने फलंदाजीला आल्यावर धमाकेदार फलंदाजी केली आणि त्यामुळेच भारताला चांगल्या धावा करता आल्या. पंतला या वेळी हार्दिकची चांगली साथ मिळाली. हार्दिकने या वेळी 64 धावांची खेळी साकारली. त्यामुळे भारताला पंत आणि हार्दिक यांच्या फलंदाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारता येऊ शकली.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply