स्वाईन फ्ल्यू, हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांत वाढ
खारघर : रामप्रहर वृत्त
शहरात स्वाईन फ्ल्यू, हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच शहरात सध्या विविध ठिकाणी गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचे नवे संकट उभे ठाकले आहे.
खारघरमधील घरकुल तसेच सेक्टर 12 मधील विसावा, शिवाजी, सामुद्रिका, जागृत, सूर्योदय, शिवसागर या सोसायट्यांना सध्या दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबतच्या तक्रारी रहिवाशांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे केल्या आहेत, मात्र सिडकोने पाण्याची तपासणी केल्यानंतर हे पाणी पिण्यायोग्य असल्याचे सांगितले आहे. या पाण्याला वेगळाच प्रकारचा वास येत असल्यामुळे रहिवासी चिंतेत आहेत. सेक्टर 14 मेट्रो पुलाखाली जलवाहिनी दुरुस्तीच्या मातीमुळे पाणी गढूळ झाल्याचे सिडकोकडून सांगितले जात आहे. त्यामुळे ही समस्या तत्काळ दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे
दहा दिवसांत पाणीटंचाईवर तोडगा खारघरमधीप सेक्टर 34 ते 36 परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत सोसायटीच्या शिष्टमंडळाने सिडकोचे मुख्य अभियंता राजेंद्र धायतकर यांची भेट घेतली होती. या बैठकीत सेक्टर 34 ते 36 परिसरात सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सोसायटीला भेट देऊन पाहणी करून ही समस्या दहा दिवसांत सोडवतील, असे आश्वासन दिले आहे.
दुषित पाण्यामुळे रोगराई
खारघर : सेक्टर 15 ते 19 परिसरात मल मिश्रित पाणी रस्त्यावर जात असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या मलमिश्रित पाण्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
सिडकोने खारघर सेक्टर सतरा वास्तुविहार गृहनिर्माण शेजारी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. या केंद्रात सेक्टर पंधरा घरकुल, स्पॅगेटी, वास्तुविहार, सेलिब्रेशन, सेक्टर अठरा आणि एकोणीस परिसरातील सोसायट्यांतील सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सोसायटीतील मलमिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास मलनिस्सारण वाहिन्या भरल्यास सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या परिसरात चाळीस हजारांच्यावर लोकसंख्या आहे. त्यामुळे रस्त्यावर येत असलेल्या सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांमध्ये आहे.
माजी नगरसेविका संजना समीर कदम यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांची भेट घेऊन ही समस्या निदर्शनास आणून दिली, मात्र अजूनही सिडकोकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. सिडकोने पाणी तपासणीसाठी पाठविले असता, पिण्यायोग्य पाणी असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले, मात्र आजही पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत असल्यामुळे पाणी उकळून पिण्याची वेळ आली आहे.
-रवींद्र पाटील, पदाधिकारी, शिवसागर सोसायटी
खारघरमध्ये वाढत असलेल्या डेंग्यू, स्वाईन फ्लूला रोखण्यासाठी पनवेल महापालिकेमार्फत शहरात फवारणी, तसेच अन्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी लवकरच निवेदनाद्वारे करणार आहे.
-ब्रिजेश पटेल, खारघर मंडल अध्यक्ष, भाजप