Breaking News

गणपती कारखानदार हवालदिल

बाप्पांच्या परदेशवारीला कोरोनाचा खो

पेण : प्रतिनिधी

राज्य सरकारने मिनीलॉकडाऊनला सुरुवात केल्याने आणि परदेशातही अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्याने पेण तालुक्यातील गणेशमूर्ती कारखानदार अडचणीत सापडले आहेत.

पेण हे गणेशमूर्तीचे माहेरघर म्हणून जगात ओळखले जाते. याच पेणमधून लाखो गणपती मूर्ती परदेशात जात असतात. पेण तालुक्यातील हमरापूर, जोहे, अंतोरे, तांबडशेत यासह पेण शहरातील अनेक कारखान्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या जवळपास 30 ते 35 हजार गणेशमूर्ती मॉरिशस, थायलंड, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका आदी देशांत जातात. मागच्या वर्षी रखडलेल्या बाप्पांची परदेशवारी यावर्षी तरी होईल, अशी आशा गणपती कारखानदारांना होती, पण काही देशांमध्ये तसेच महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने यावर्षी बाप्पा परदेशवारी न करता आपल्याच घरात राहण्याची शक्यता असल्यामुळे गणेशमूर्ती कारखानदार आर्थिक अडचणीत आले आहेत.

कच्च्या मालाकरिता गणेशमूर्ती कारखानदार  विविध बँकांकडून कर्ज घेतात. याच कर्जातून कामगारांचे पगार करतात. कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र मिनी लॉकडाऊन लावल्याने सातासमुद्रापार जाणार्‍या गणेशमूर्ती जाग्यावरच थांबल्या. त्यामुळे बँकेचे कर्ज फेडणार कसे, या विवंचनेत मूर्तिकार आहेत. दर वर्षी मान्सून हंगामाच्या अगोदर साधारणपणे मार्च ते मे अखेरपर्यंत 70 ते 80 दिवसांच्या कालावधीत बाप्पांच्या परदेशात प्रवेशाचा कालावधी असतो. परदेशातील गणेशभक्तांनी पेणमधील मागणी केलेल्या प्रत्येक गणेशमूर्ती कारखान्यात तयार झाल्या असून परदेशात लॉकडाऊन असल्याने बाप्पांची परदेशवारी थांबली असल्याने मूर्तिकार संकटात सापडले आहेत.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply