Breaking News

भारताची अर्जेंटिनावर पुन्हा मात

एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये सलग दुसरा विजय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनावर दुसर्‍या सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवत 3-0 असा विजय संपादन केला. एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये अर्जेंटिनाविरुद्ध सलग दुसरा विजय मिळवत भारतीय संघाने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.

हरमनप्रीत सिंग (11व्या मिनिटाला), ललित उपाध्याय (25व्या मिनिटाला) आणि मनदीप सिंग (58व्या मिनिटाला) यांनी गोल करीत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह भारताने आणखी तीन गुणांची कमाई केली. शनिवारी मध्यरात्री भारतीय संघाने निर्धारित वेळेत 2-2 अशी बरोबरी साधल्यानंतर अर्जेंटिनावर पेनल्टी-शूटआऊटमध्ये 3-2 अशी सरशी साधली होती. भारताचे पुढील सामने ग्रेट ब्रिटनविरुद्ध 8 आणि 9 मे रोजी रंगणार आहेत. त्याआधी भारतीय संघ अर्जेंटिनाविरुद्ध दोन मैत्रीपूर्ण सामने खेळणार आहे.

भारताने आठ सामन्यांत 15 गुणांची कमाई केली असून, ते गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहचले आहेत. यजमान अर्जेंटिनाला 12 सामन्यांत 11 गुणांसह सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. भारत, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया हे संघ ऑलिम्पिकसाठी एकाच गटात असल्याने भारताला याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर भारताच्या अ गटात स्पेन, न्यूझीलंड आणि यजमान जपान यांचाही समावेश आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply