बंगळुरूची हैदराबादवर मात

चेन्नई ः वृत्तसंस्था

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईत रंगलेल्या आयपीएलच्या सहाव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा सहा धावांनी पराभव केला. बंगळुरूने 20 षटकांत 8 बाद 149 धावा केल्या होत्या. त्यानंतर भेदक गोलंदाजीद्वारे हैदराबादला 20 षटकांत 9 बाद 143 धावांपर्यंत रोखले. बंगळुरूकडून अर्धशतक ठोकलेल्या मॅक्सवेलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. बंगळुरूचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय, तर हैदराबादचा सलग दुसरा पराभव ठरला. हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी डावाची सुरुवात केली. बंगळुरूचा गोलंदाज मोहम्मद सिराजने पहिलेच षटक निर्धाव टाकले. दुसर्‍याच षटकात त्याने साहाला तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर मनीष पांडे आणि वॉर्नर यांनी डाव सांभाळला. अर्धशतकानंतर जेमिसनला मोठा फटका खेळण्याच्या नादात वॉर्नर बाद झाला. त्याने सात चौकार आणि एका षटकारासह 54 धावा केल्या. शेवटच्या चार षटकांत 35 धावांची गरज असताना हैदराबादने जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे आणि अब्दुल समद या तीन फलंदाजांना शाहबाज अहमदच्या एकाच षटकात गमावले. त्यानंतर विजय शंकरही हर्षल बाद झाला. राशिद खानने सिराजला पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत धावांचे अंतर कमी केले, मात्र याच षटकात जेसन होल्डर झेलबाद झाला. शेवटच्या षटकात हैदराबादला 16 धावांची गरज होती. हर्षल पटेलने टाकलेल्या या षटकात हैदराबादला नऊच धावाच घेता आल्या. बंगळुरूकडून अहमदने दोन षटकांत सात धावा देत तीन बळी टिपले. सिराज आणि पटेलने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तत्पूर्वी, बंगळुरूकडून विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांनी डावाची सुरुवात केली, मात्र तिसर्‍याच षटकात भुवनेश्वरने पडीक्कलला तंबूचा मार्ग दाखवला. त्याने 11 धावा केल्या. काही धावांच्या अंतरानंतर तिसर्‍या क्रमांकावर खेळायला आलेला शाहबाज अहमदही (14) बाद झाला. त्यानंतर विराट आणि ग्लेन मॅक्सवेलने बंगळुरूला सावरले. संघाला शतकाजवळ नेताना जेसन होल्डरने विराटला बाद केले. विराटे 33 धावा केल्या. विराटनंतर एबी डिव्हिलियर्स मैदानात आला, मात्र राशिद खानने त्याला स्थिरावण्याची संधीच दिली नाही. तो एका धावेवर बाद झाला. शतकानंतर बंगळुरूने वॉशिंग्टन सुंदर (8) आणि डॅनियल ख्रिश्चन (1) या आपल्या अजून दोन फलंदाजांना गमावले. मनीष पांडेने सुंदरचा अप्रतिम झेल टिपला. राशिदने आपल्या चार षटकांत फक्त 18 धावा देत दोन बळी घेतले, तर टी. नटराजनने ख्रिश्चनला यष्टीपाठी झेलबाद केले. दुसर्‍या बाजूला असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने पाच चौकार आणि तीन षटकारांसह 59 धावांची खेळी केली. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर राशिद खानने त्याच्या चार षटकांत 18 धावात देत दोन फलंदाजांना माघारी धाडले.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply