मुंबई ः प्रतिनिधी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात बाद झाल्यानंतर कोहली रागात होता. या वेळी त्याने ड्रेसिंग रुमकडे परतताना जाहिरातीच्या फलकावर बॅट मारली व नंतर बॅटने खुर्ची उडवली. याची गंभीर दखल घेत मॅच रेफ्री व्ही. नारायण कुट्टी यांनी आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल विराट कोहलीला चांगलेच फटकारले आहे. आयपीएल प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत कोहलीला आचारसंहितेच्या लेव्हल 1 गुन्हा 2.2चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले. या नियमांतर्गत क्रिकेट उपकरणांशिवाय मैदानातील साहित्याचे नुकसान करणे अशा बाबींचा समावेश होतो. त्यानंतर मॅच रेफ्री व्ही. नारायण कुट्टी यांनी आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल विराट कोहलीला चांगलेच फटकारले. आयपीएलनेही एका निवेदनाद्वारे याबाबत विराट कोहलीने आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 1 गुन्हा 2.2चे उल्लंघन केल्याचे कबूल केले आहे. आचारसंहितेच्या लेव्हल 1च्या उल्लंघनासाठी सामन्याच्या रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे.