Breaking News

मुंब्र्यात रुग्णालयात आग; चार रुग्णांचा मृत्यू

ठाणे ः प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने महाराष्ट्राला तडाखा दिला असतानाच दुसरीकडे रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. नागपूर, मुंबई, नाशिक येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांच्या आठवणी विस्मृतीत जात नाही, तोच महाराष्ट्रावर पुन्हा एक आघात झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात बुधवारी (दि. 28) पहाटे आगडोंब उसळला. यात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंब्रा येथे मुंबई-पुणे मार्गावरील शिमला पार्क परिसरात असलेल्या हसन टॉवरमध्ये पहिल्या मजल्यावर प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात बुधवारी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास आगीचा भडका उडाला. या वेळी रुग्णालयात 20 रुग्ण उपचार घेत होते. यात आयसीयू वार्डात सहा, तर इतर वार्डात 14 रुग्ण होते. आग लागल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आयसीयूमधील रुग्णांना तातडीने बिलाल रुग्णालयात हलविण्यात आले, तर इतर रुग्णांना सुटी देण्यात आली.
या दुर्घटनेत चार रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे. रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात घेऊन जात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली. या रुग्णालयात कोरोनाव्यतिरिक्त इतर व्याधी असणारे रुग्ण उपचार घेत होते. मृतांच्या वारसांना पाच लाख, तर जखमींना एक लाख रुपये मदत दिली जाणार आहे.
रुग्णालयांची सुरक्षा ऐरणीवर
राज्यात मागील काही महिन्यांपासून रुग्णालयात आग लागण्यासह इतर दुर्घटना घडल्या आहेत. भंडार्‍यातील घटनेपासून हे सत्र सुरू असून, नागपूरमध्ये एका रुग्णालयाला आग लागून 10 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर त्यापाठोपाठ मुंबईत आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. नाशिकमध्येही ऑक्सिजनच्या टाकीला गळती लागल्याने 24 रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. यामुळे रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply