…तर दोन्ही संघ संयुक्त विजेते

डब्ल्यूटीसी फायनलबाबत आयसीसीची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

भारत आणि न्यूझीलंड संघांत पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये 18 ते 22 जून या कालावधीत जागतिक कसोटी विजेतेपदाचा अंतिम सामना होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने या सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन्सची शुक्रवारी (दि. 28) घोषणा केली. त्यानुसार ही कसोटी अनिर्णीत राहिली किंवा ’टाय’ झाली तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येईल.

आयसीसीने या कसोटीसाठी राखीव दिवसही जाहीर केला. या सामन्यासाठी 23 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसांत कोणत्याही कारणांनी खेळ वाया गेल्यास तो राखीव दिवशी खेळवण्यात येईल. त्याबाबतचा निर्णय सामनाधिकारी आणि पंच मिळून 22 जूनला अखेरच्या तासांत घेतील.

आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपदाची सुरुवात ऑगस्ट 2019मध्ये झाली होती, मात्र कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे चॅम्पियनशिपचे बहुतांश सामने खेळवण्यात आले नाहीत. एवढेच नाही तर मागील वर्षी आयसीसीने कसोटी विजेतेपदाच्या नियमांमध्ये बदलही केले होते.

या स्पर्धेत भारताची कामगिरी आतापर्यंत उत्तम राहिली आहे. भारताने 520 अंकांसह चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला, तर न्यूझीलंडचा संघ 420 अंकांसह दुसर्‍या स्थानावर राहिल्याने त्याने अंतिम फेरीत धडक मारली.

न्यूझीलंडचा संघ अंतिम सामन्यासाठी आधीच इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे संघातील सर्व खेळाडूंना इंग्लंडमध्ये 10 दिवस क्वारंटाइन व्हावे लागेल, मात्र या काळात खेळाडूंना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Check Also

Пинко казино: Азартные игры или развлечение?

Пинко казино: Азартные игры или развлечение? Вопрос о том, является ли Пинко казино азартной игрой …

Leave a Reply