Breaking News

बीसीसीआयची आज मुंबईत बैठक

मुंबई ः प्रतिनिधी

आयपीएल 2021मधील उर्वरित सामने, यंदाचा टी-20 वर्ल्डकप आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा या सर्व गोष्टींवर निर्णय घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय शनिवारी (दि. 29) विशेष बैठक (एसजीएम) घेणार आहे. या बैठकीसाठी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

यंदा भारतात टी-20 क्रिकेट वर्ल्डकप होणार असून बीसीसीआय याची तयारी करीत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत या स्पर्धेचे आयोजन करेल. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत या स्पर्धेच्या कार्यक्रमाची विशेष रूपरेषा तयार करण्यासाठी बीसीसीआयने 29 मे रोजी एक बैठक बोलावली आहे.

वर्ल्डकपसोबतच या बैठकीत देशांतर्गत क्रिकेट हंगामावर (2021-22) चर्चा होणार आहे. देशातील कोरोनाचा प्रसार लक्षात घेऊन आगामी स्थानिक क्रिकेट हंगामाची चर्चा करण्यासाठी बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा 29 मे रोजी होईल, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी राज्य क्रिकेट संघटनांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.

मागील हंगामात रणजी स्पर्धा खेळविण्यात न आल्याने बीसीसीआय या वर्षी सप्टेंबरपासून घरगुती हंगाम सुरू करण्याचा विचार करीत आहे. 2020-21च्या मोसमात विजय हजारे एकदिवसीय आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 करंडक या मर्यादित षटकांच्या स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. नव्या हंगामाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेने होऊ शकते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply