Breaking News

आयपीएलपाठोपाठ टी-20 वर्ल्डकपही यूएईत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वर्षाच्या अखेरीस भारतात होणारा टी-20 वर्ल्डकप यूएई आणि ओमान येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील कोरोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. हे सामने यूएईत होत असले, तरी बीसीसीआयकडून या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
वर्ल्डकप टी-20 स्पर्धेला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी होईल. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार आहेत. अबुधाबी, दुबई आणि शारजामध्ये वर्ल्डकपचे सामने खेळवले जातील.
कोरोनामुळे आयपीएलची उर्वरित स्पर्धाही यूएईत ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना 15 ऑक्टोबरला असणार आहे. त्यामुळे टी 20 वर्ल्डकपपूर्वी खेळाडूंची चांगलीच दमछाक होईल. याबाबतचे वृत्त ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ने दिले आहे.
वृत्तानुसार टी-20 वर्ल्डकप दोन फेर्‍यांमध्ये खेळला जाईल. पहिली फेरी यूएई आणि ओमानमध्ये होईल. राऊंड 1मध्ये 12 सामने होणार असून त्यामध्ये आठ संघ भिडणार आहेत. आठपैकी चार संघ ‘सुपर 12’साठी पात्र ठरतील. ‘सुपर 12’साठी बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा सामना होणार आहे.
अहवालानुसार सुपर 12 फेरीत एकूण 30 सामने होणार आहेत. ही फेरी 24 ऑक्टोबरपासून सुरू होईल. सुपर 12 फेरीत सहा-सहा संघांना दोन स्वतंत्र गटात विभागले जाईल. ‘सुपर 12’नंतर तीन प्ले ऑफ सामने, दोन उपांत्य फेरीचे आणि शेवटी अंतिम सामना होईल.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply