अलिबाग : जिमाका
रोहा वनविभागातील महाड वन परिक्षेत्रातील किल्ले रायगड परिसरात नुकताच हवाई बी पेरणी करण्यात आली. मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांच्या हस्ते या हवाई बी पेरणी उपक्रामाचे उद्घाटन करण्यात आले. रोहा येथील उप वनसंरक्षक अप्पासाहेब निकत, सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव, वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे (महाड), निलेश पाटील (म्हसळा), प्रशांत पाटील (मुरुड), मिलिंद राऊत (श्रीवर्धन) यांच्यासह महाड वन परिक्षेत्रातील सर्व कर्मचारी या वेळी उपस्थित होते. मजुरांमार्फत प्रचलित पध्दतीने वनीकरण करणे शक्य नसलेल्या रायगड किल्ल्यावरील हत्ती तलाव, हनुमान टाकी, दारुखाना, टकमक टोक, कोळीव तलाव, छत्रपती शिवाजी महाराज समाधी, काळा हौद, आडवा तट, बाराटाकी, कुशावर्त तलाव, हिरकणी बुरुज, मदरसा परिसरात या वेळी प्रायोगिक तत्वावर ड्रोनचे माध्यमातून हवाई बी पेरणी करण्यात आली. त्यासाठी खैर, शिसम, आवळा, बांबू, बहावा, करंज, रिठा, कांचन, बैल, जांभूळ, आपटा अशा स्थानिक प्रजातींचे 25 हजार सीडबॉल तयार करण्यात आले होते. किल्ले रायगड परिसरातील 25 हेक्टर क्षेत्रावर 1 ते 06 जुलै दरम्यान हवाई बी पेरणी पूर्ण करण्यात आली, असे रोहा वनविभागाचे उप वनसंरक्षक आप्पासाहेब निकत यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper