किल्ले रायगडचा तख्त जिंकण्यासाठी शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती सज्ज झाली आहे. देशाच्या लोकशाही मंदिरात रायगडचा मावळा हा भगव्याचाच पाईक असला पाहिजे. त्यासाठी रायगडवासीयांनी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन दिल्लीत रायगडचे ज्वलंत अस्तित्व दाखवून द्या.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुनित स्पर्शाने पावन झालेला रायगड पुन्हा एकदा काबिज करण्याचा निर्धार राज्यातील सत्ताधारी शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीने केला आहे. त्यासाठी महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते अखंडपणे प्रयत्न करू लागलेले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून शिवसेना-भाजपचे अनंत गीते हे सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनाच पुन्हा रिंगणात उतरविण्यात आलेले आहे. त्यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पेण येथे, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी माणगाव येथे जाहीर सभा घेत मतदारांना पुन्हा एकदा रायगडावर भगवा फडकाविण्याचे आवाहन केलेले आहे. कारण ही निवडणूक दिल्लीची आहे, ती गल्लीची नाही. देशाचे तख्त राखण्यासाठी समर्थ असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये रायगडचा मावळा असणे ही काळाची गरज असल्याने अनंत गीते यांना पुन्हा प्रचंड मताधिक्याने विजयी करणे हे शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीचे प्रमुख ध्येय राहिलेले आहे. जिल्ह्यात शिवसेनेबरोबरच भाजपची वाढलेली ताकद आज गीतेंसाठी उपयुक्त ठरत आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील भाजपची टीम अहर्निशपणे प्रचारात झोकून देत काम करीत आहे. याचा फायदा निश्चितच गीतेंना होणार आणि ते पुन्हा एकदा लोकसभेवर जाणार हे अधोरेखित झालेले आहे. आता उरला प्रश्न विरोधकांचा. सुनील तटकरे हे निकराची झुंज देत आहेत. शेकापच्या नेत्यांची साथ असली, तरी प्रत्यक्षात शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते सुनील तटकरेंच्या प्रचारापासून अलिप्त राहिल्याचे जाणवत आहे. काँग्रेसवालेही चार हात दूर राहूनच प्रचारात सहभागी झाल्याचे दाखवित आहेत. याचा परिणाम प्रचारात होऊ लागल्याने तटकरे कमालीचे अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. आधीच त्यांच्यावर नानाविध आरोप झालेले आहेत. शिवाय मित्रपक्षांचे असहकार्य यामुळे त्यांची अवस्था दोलायमान अशीच झालेली आहे. अर्थात मतदानाला अजून चार-सहा दिवसांचा कालावधी उरला आहे. रात्र वैर्याची असल्याने सर्वच राजकीय पक्ष, उमेदवार आणि सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून चौकीदाराची भूमिका प्रामाणिकपणे बजावित आहेत. मतदार राजाला खूष करण्यासाठी सर्व तर्हेने प्रयत्नही सुरू आहेत, तर आचारसंहितेचे कारण देत जिल्हा प्रशासन हातात कायद्याचा दंडुका घेऊन जागल्यासारखा उभा आहे. त्यातून रायगडचा सुज्ञ मतदार आपले एक मत रायगडच्या मातीशी प्रामाणिक असलेल्या उमेदवाराला देऊन लोकशाही बळकट करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. त्याची सत्वपरीक्षा 23 एप्रिलला रायगडात होणार आहे. एकूणच रायगडचे राजकीय वातावरण कडक उन्हासारखे चांगलेच तापू लागलेले आहे. त्यात आता जाहीर प्रचारसभांनी वातावरण आणखी तप्त होऊ लागलेले आहे.